राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा: अंकुर स्पोर्ट्स, लायन्स क्लब, बंड्या मारुती, चांदेरे फाऊंडेशन उपांत्य फेरीत
मुंबई : अमरहिंद मंडळातर्फे आयोजित पुरुषांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंकुर स्पोर्ट्स, लायन्स क्लब, बंड्या मारुती आणि चांदेरे फाऊंडेशन या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. दादर येथील गोखले रोडच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आता लायन्स क्लबसमोर अंकुर स्पोर्ट्सचे, तर बंड्या मारुतीसमोर चांदेरेचे आव्हान असेल.
मुंबईच्या अंकुर संघाने ओम पिंपळेश्वरला ५३-२१ अशी धूळ चारली. सुशांत साईलने त्यांच्यासाठी चढायांचे तब्बल २२ गुण कमावले. पुण्याच्या चांदेरे फाऊंडेशनने मुंबईच्या विजय क्लबचा प्रतिकार ४०-२८ असा मोडीत काढला. अजित चौहानने चढायांचे ११, तर तेजस काळभोरने ५ गुण मिळवले.
तिसऱ्या लढतीत मुंबईच्या लायन्स क्लबने रायगडच्या मिड लाईनचा ३९-२० असा पाडाव केला. राज आचार्यने अष्टपैलू खेळ करताना चढायांचे १४, तर बचावात २ गुण प्राप्त केले. चौथ्या सामन्यात मुंबईच्या बंड्या मारुती संघाने ठाण्याच्या विजय स्पोर्ट्स संघावर ४१-३७ अशी मात केली.