राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा: सांगली, पुण्याचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

कुपवाड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात धाराशीवने कोल्हापूरचा १०-९ असा २ मिनिटे राखून पराभव केला.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा: सांगली, पुण्याचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
Published on

सांगली : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने सांगली येथे सुरू असलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत किशोरी-किशोरी गटात सांगलीच्या, तर पुरुष व महिला गटात पुण्याच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली.

कुपवाड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात धाराशीवने कोल्हापूरचा १०-९ असा २ मिनिटे राखून पराभव केला. मैथिली पवार (३ मिनिटे संरक्षण व आक्रमणात २ गडी), सिद्धी भोसले (१.४० मि., २ गडी) यांना विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या लढतीत सांगलीने सोलापूरला ९-४ अशी एक डाव राखून धूळ चारली. वैष्णवी चाफे (२ मि., ३ गडी), वेदिका तामखेडे (४.२० मि.), श्रावणी तामखेडे (४ मि.) यांनी अफलातून कामगिरी केली.

किशोर गटात सांगलीने पुण्यावर १३-१३ अशी मात केली. श्री दळवीने २.५० मिनिटे संरक्षण केले. त्याला संग्राम डोबळेने पाच गडी टिपून आक्रमणात साथ दिली. ठाण्याने साताऱ्याला ९-६ असे हरवले. ओमकार सावंत (३ मि.), अमन गुप्ता (३ मि.) व विनायक भोगे (१ मि.) यांनी चमकदार खेळ केला.

महिला गटात पुण्याने सांगलीला १८-८ अशी धूळ चारली. काजल भोर (५ गडी) व दिपाली राठोड (३.१० मि.) यांनी अनुक्रमे आक्रमण व संरक्षणात कमाल केली. धाराशीवने कोल्हापूरला १५-१० असे नेस्तनाबूत केले. अश्विनी शिंदे (२.३० मि.), जान्हवी पेठे (१.४० मि.), सुहानी धोत्रे (४ गडी) यांनी विजयात मोलाचे योगदान दिले.

पुरुष गटात पुण्याने सांगलीवर १३-१२ अशी सरशी साधली. आदित्य गणपुले (२.३० मि., ४ गडी) व सुयश गरगटे (१.२० मि., १ गडी) यांनी अष्टपैलू भूमिका बजावली. मुंबई उपनगरने ठाण्यावर अतिरिक्त डावापर्यंत रंगलेल्या सामन्यात २७-२६ अशी मात केली. निखिल सोडये (२.२० मि.), अनिकेत पोटे (१.५० मि.) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

अंतिम फेरीतील सामने

किशोर गट : सांगली वि. धाराशीव

किशोरी गट : सांगली वि. ठाणे

पुरुष गट : मुंबई उपनगर वि. पुणे

महिला गट : पुणे वि. धाराशीव

logo
marathi.freepressjournal.in