भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथचा मोठा निर्णय; वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, कसोटी क्रिकेटबद्दल काय म्हणाला?

स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथचा मोठा निर्णय; वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, कसोटी क्रिकेटबद्दल काय म्हणाला?
एक्स (@CricketAus)
Published on

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात, मंगळवारी भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने मोठा निर्णय घेतला असून, वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, स्मिथ अजूनही ऑस्ट्रेलियासाठी कसोटी आणि टी-२० क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध असेल. स्मिथने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध आपल्या संघासाठी सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली होती. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्मिथवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या २०१५ आणि २०२३ वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्य राहिला आहे. २०१५ मध्ये तो ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा कर्णधार होता. स्मिथला २०१५ आणि २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम वनडे खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. तसेच, तो २०१५ च्या आयसीसी पुरुष वनडे संघाचा देखील सदस्य होता.

स्मिथचे वनडे करियर

स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो. २०१० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केल्यापासून, त्याने १७० वनडे सामने खेळले आणि ४३.२८ च्या सरासरीने ५८०० धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात १२ शतके आणि 35 अर्धशतके आहेत. याशिवाय, स्मिथने वनडेमध्ये फिरकी गोलंदाजी करताना ३४.६७ च्या सरासरीने २८ विकेट्सही घेतल्या आहेत. २०१६ मध्ये एमसीजी येथे न्यूझीलंडविरुद्धची १६४ धावांची खेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

"कसोटीमध्ये मी अजूनही बरेच काही योगदान देऊ शकतो"

वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर स्टीव्ह स्मिथने निवेदनात म्हटले की, "हा एक अविस्मरणीय प्रवास होता आणि मी यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. खूप सारे अद्भुत क्षण आणि सुंदर आठवणी या प्रवासात मिळाल्या. दोन वर्ल्ड कप जिंकणे ही एक मोठी उपलब्धी होती आणि या प्रवासात सहभागी झालेल्या उत्कृष्ट सहकाऱ्यांसोबत घालवलेला वेळ अविस्मरणीय आहे. आता इतरांना २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी तयारी सुरू करण्याची उत्तम संधी आहे, त्यामुळे निवृत्ती घेण्यासाठी हीच वेळ योग्य वाटते." पुढे त्याने कसोटी क्रिकेट मात्र यापुढेही खेळणार असल्याचे स्पष्ट केले. "मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी उत्सुक आहे, तसेच हिवाळ्यात वेस्ट इंडिजविरुद्ध आणि नंतर इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठीही मी सज्ज आहे. या स्तरावर मी अजूनही बरेच काही योगदान देऊ शकतो, असे मला वाटते."

logo
marathi.freepressjournal.in