नवी मुंबईच्या पोलीस दलातील सुभाष पुजारी हे मास्टर्स आशिया श्रीचे मानकरी

व्हिएतनाम येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकाविले होते.
 नवी मुंबईच्या पोलीस दलातील सुभाष पुजारी हे मास्टर्स आशिया श्रीचे मानकरी

मालदीवच्या माफुशी बेटावर सुरू असलेल्या ५४ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाच्या पहिल्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदकांसह १२ पदकांची कमाई केली. नवी मुंबईच्या पोलीस दलातील सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी हे ‘मास्टर्स आशिया श्री’चे मानकरी ठरले. व्हिएतनाम येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकाविले होते. दिव्यांगाच्या गटात के. सुरेश, ज्युनिअर गटात (७५ किलो) सुरेश बालाकुमार, स्पोर्ट्स फिजीक प्रकारात अथुल कृष्णा यांनी सोनेरी यश मिळविले.

वादळी वाऱ्याचे आगमन

दरम्यान, माफुशी बेटावर वादळी वाऱ्याचे आगमन झाल्यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली; मात्र मालदीव शरीरसौष्ठव संघटनेने तासाभरात नव्या आयोजनस्थळाची व्यवस्था केली. ११ गटाच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या या स्पर्धेच्या प्रारंभापासून भारतीय खेळाडूंनीही वादळी कामगिरीचा धडाका दिला. दिव्यांगाच्या पहिल्याच गटात सुर्वणच नव्हे, तर रौप्य आणि कांस्यपदकही भारतीयांनी जिंकले. के. सुरेशने सुवर्ण विजेती कामगिरी करत भारताचे सुवर्णपदकाचे खाते उघडले.

सुवर्णपदक महाराष्ट्र

पोलीस दलाला अर्पण

सुभाष पुजारी यांनी आपले सुवर्ण महाराष्ट्र पोलीस दल, वरिष्ठ अधिकारी यांना अर्पण केले. ते म्हणाले की, आता माझे पुढील लक्ष्य जागतिक स्पर्धेत याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची असेल. भारताच्या के. सुरेश आणि सुभाष पुजारीपाठोपाठ स्पोर्ट्स फिजीकच्या १७५ से.मी. उंचीच्या गटात अथुल कृष्णाने इराणच्या महदी खोसरामवर मात करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला; मात्र स्पोर्ट्स फिजीकच्या १७० से.मी.च्या गटात युवराज जाधवचे सोने थोडक्यात हुकले.

मालदीवच्या अझनीन राशद अनपेक्षितपणे अव्वल ठरला. ज्युनिअर गटाच्या ७५ किलोवरील वजनी गटात सुरेश बालाकुमारने बाजी मारली. भारताच्या अंबरीश केजी, मनु कृष्णन यांनीही रौप्यपदके पटकावली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in