राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी मिळविलेले यश देशाला प्रेरक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या सर्वांचा त्यांनी सत्कार केला. भारतीय खेळाडू नवनव्या खेळात प्रावीण्य मिळवत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तब्बल ६१ पदके मिळविली, याकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारतीय खेळाडू हे कोणत्याही खेळासाठी तत्पर असतात. ज्या खेळाडूंचे थोडक्यात पदक हुकले त्यांनी भारताची माफी मागण्याची गरज नाही. हे खेळाडू देशासाठी विजेतेच आहेत. फक्त आपला खेळ प्रामणिकपणे खेळत राहिले पाहिजे.” मोदी म्हणाले की, “खेळाडूंनी फक्त पदके जिंकून दिलेली नाहीत, तर भारतीयांच्या मनातील भावनांना सदृढ केले आहे.
खेळातीलच नव्हे तर इतर क्षेत्रामधील युवकांना प्रेरणा देणारे काम खेळाडूंनी केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात हातभार लावला. त्यांची जशी प्रेरणा आपणाला मिळते तशीच प्रेरणा भारतीय युवकांना खेळाडूंच्या विजयाने मिळणार आहे.