T20: सुदर्शन, जितेश, हर्षित यांनाही भारताच्या टी-२० संघात स्थान

संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे तीन खेळाडू अद्याप बार्बाडोसमध्येच अडकले असल्याने या अन्य तीन पर्यायांना निवडण्यात आले आहे.
T20: सुदर्शन, जितेश, हर्षित यांनाही भारताच्या टी-२० संघात स्थान
iplt20.com

नवी दिल्ली : आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघात डावखुरा फलंदाज साई सुदर्शन, यष्टिरक्षक जितेश शर्मा, वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांचाही समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे तीन खेळाडू अद्याप बार्बाडोसमध्येच अडकले असल्याने या अन्य तीन पर्यायांना निवडण्यात आले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने नुकताच टी-२० विश्वचषक उंचावला. त्यामुळे या संघातील जवळपास सर्व खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. ६ जुलैपासून भारत-झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले असून व्हीव्हीएस लक्ष्मण हंगामी स्वरूपावर भारताच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे.

यशस्वी, सॅमसन व दुबे यांचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश होता. मात्र भारतीय संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी जितेश, सुदर्शन व हर्षित यांना स्थान देण्यात आले. जितेश व सुदर्शन यांनी आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी केली, तर हर्षितने कोलकाताला जेतेपद मिळवून देण्यात उल्लेखनीय योगदान दिले. भारतीय संघासोबतच बार्बाडोसमध्ये असलेले रिंकू सिंग व खलील अहमद यांच्या जागी मात्र निवड समितीने अद्याप पर्यायी खेळाडूंची निवड केलेली नाही.

भारताचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा.

logo
marathi.freepressjournal.in