

नागोया : भारताचा २३ वर्षीय कुस्तीपटू सुजीत कलकलने शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुजीतने जागतिक पदकविजेत्या तजाकिस्तानच्या अब्दुल कुडिएव्हचा २-९ अशा पिछाडीवरून १०-९ असा पराभव करत दंगल घडवली.
या स्पर्धेपूर्वी हरयाणाच्या सुजीतने कझाकिस्तान आणि जपानच्या मल्लांविरुद्धही चमकदार कामगिरी केली. जपानचा ऑलिम्पिक विजेता कियोकाविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने ३-३ अशी बरोबरी साधत निकषाच्या आधारावर आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत सुजीतने इराणच्या अब्बास इब्राहिमविरुद्ध एकही गुण न गमावता १०-० असा तांत्रिक वर्चस्वाच्या बळावर विजय मिळवला. पहिल्या फेरीत अफगाणिस्तानच्या सईद झझईवरही त्याने १३-३ असे वर्चस्व गाजवले.
अंतिम फेरीत कुडिएव्हने सुरुवातीला सुजीतला आक्रमणाची संधी न देता आर्म लॉकचा प्रभावी वापर केला आणि पहिल्या टप्प्यात ९-२ अशी आघाडी घेतली. मात्र, सुजीतने आपल्या वेगवान हालचाली आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर सामन्याचा नूरच पालटला. त्याने सलग आठ गुण मिळवत आघाडी १०-९ अशी केली. सामना संपण्यास सुमारे २० सेकंद बाकी असताना त्याने निर्णायक टेकडाउन मिळवला आणि अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत सुवर्णपदक निश्चित केले.
दरम्यान, भारताची युवा कुस्तीपटू दीपांशी फोगाट हिला महिलांच्या ५० किलो गटात जपानच्या युई सुसाकीकडून ०-१० असा पराभव पत्करावा लागला. सुसाकी अंतिम फेरीत पोहोचल्याने दीपांशीला रेपेचाजमध्ये संधी मिळाली. तिने कंबोडियाच्या सामनांग डिटांडचा १०-० असा पराभव केला. मात्र कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या झेनिप बायानोव्हाकडून तिला पराभव स्वीकारावा लागला.
पुरुषांच्या १२५ किलो गटात रजत आणि महिलांच्या ७६ किलो गटात प्रिया मलिक यांचे आव्हानही संपुष्टात आले. शनिवारी अमन सेहरावत, दीपक पुनिया, अंतिम पंघाल आणि मनीषा भानवाला भारताकडून रिंगणात उतरतील.
एकूण पदके ७६
भारताने शुक्रवारी दिवसभरात १० पदकांची कमाई केली. यामध्ये ६ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्यपदकांचा समावेश होता. सध्या १६ सुवर्ण, २५ रौप्य, ३५ कांस्य अशा एकूण ७६ पदकांसह भारत पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या ३-४ दिवसांत भारताने मुसंडी मारली आहे.
हे महत्त्वाचे !
गेल्या १२ महिन्यांत २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद, आशियाई अजिंक्यपद आणि झाग्रेब ओपन स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या २३ वर्षीय सुजीतचे हे पहिलेच आशियाई सुवर्णपदक आहे.
यंदाच्या स्पर्धेतील कुस्तीमधले भारताचे हे एकंदर तिसरे व पहिलेच सुवर्ण ठरले. नितेश सिवाचने ग्रीको रोमनमध्ये रौप्य, तर सुनील कुमारने कांस्य जिंकले होते.