...म्हणून सुनील छेत्रीची निवृत्ती मागे; भारतीय फुटबॉल संघात करणार पुनरागमन, मुख्य प्रशिक्षकांनी सांगितलं कारण

भारताचा तारांकित फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.
...म्हणून सुनील छेत्रीची निवृत्ती मागे; भारतीय फुटबॉल संघात करणार पुनरागमन, मुख्य प्रशिक्षकांनी सांगितलं कारण
एक्स - @IndianFootball
Published on

नवी दिल्ली : भारताचा तारांकित फुटबॉलपटू आणि माजी कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मार्च महिन्यात भारतीय फुटबॉल संघ २०२६च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता फेरीचे सामने खेळणार आहे, यात सुनिल छेत्री पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये मैदानात दिसेल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून सुनील छेत्रीच्या पुनरागमनाची घोषणा केली.

४० वर्षीय छेत्रीने गतवर्षी जून महिन्यात कोलकाता येथे कुवैतविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ती लढत बरोबरीत सुटली होती. त्यानंतर इगॉर स्टिमॅच यांनीही संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. सध्या गेल्या चार सामन्यांत भारताने फक्त दोन गोल केले आहेत. त्यामुळे आगामी फिफा विश्वचषकाच्या पात्रता सामन्यांच्या दृष्टीने छेत्रीचे पुनरागमन संघासाठी महत्त्वाचे आहे.

भारतीय संघ एएफसी आशियाई चषक या आशिया खंडातील पात्रता स्पर्धेत मालदीव्स आणि बांगलादेश या संघांशी दोन हात करणार आहे. त्यानंतर जूनमध्ये भारताची हाँगकाँग व सिंगापूरशी गाठ पडणार आहे. किमान मार्च महिन्यातील लढतींसाठी छेत्री संघात परतला असल्याचे फुटबॉल महासंघाने जाहीर केले आहे.

मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले सुनील छेत्रीच्या पुनरागमनाचे कारण-

भारताचे मुख्य प्रशिक्षक मोनोलो मार्केझ यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून छेत्रीने पुनरागमनाचा निर्णय घेतलाय. संघाला अधिक बळकटी मिळावी यासाठी छेत्रीला पुनरागमन करण्याची विनंती केली होती असे, मार्केझ यांनी सांगितले. छेत्रीने ही विनंती स्वीकारली आणि त्यामुळेच त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. भारताने मार्च महिन्यात होणाऱ्या सामन्यांसाठी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हे सामने शिलाँग येथे खेळवले जाणार आहेत. "आमच्यासाठी आशियाई चषक पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेचे आणि आगामी सामन्यांचे महत्त्व लक्षात घेऊन, मी सुनील छेत्रीशी चर्चा केली आणि राष्ट्रीय संघ मजबूत करण्यासाठी त्याला पुनरागमन करण्यास सांगितले. त्याने ही विनंती मान्य केली आणि त्यामुळेच त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे," असे मार्केझ यांनी स्पष्ट केले.

भारतासाठी १५१ सामने खेळलेल्या छेत्रीने ९४ गोल केले आहेत. २००५ ते २०२४ या कारकीर्दीत त्याने असंख्य स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्व केले. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यानंतर सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत छेत्रीचा तिसरा क्रमांक लागतो. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाचा संघाला नक्कीच लाभ होईल.

२०२६मध्ये फिफा विश्वचषक रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारताला प्रथम आशियाई देशांत किमान अव्वल तीन संघांत स्थान मिळवावे लागेल. आशिया खंडातून दक्षिण कोरिया, जपान, असे देश फुटबॉलमध्ये मातब्बर आहेत. त्यामुळे भारताला गेल्या अनेक वर्षांपासून फिफा विश्वचषकाला पात्र ठरता आलेले नाही. छेत्रीव्यतिरिक्त भारतीय संघात असंख्य प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र निर्णायक क्षणी कामगिरी उंचावण्यात ते अपयशी ठरतात. त्यामुळे भारताने आता छेत्रीच्या पुनरागमनात छाप पाडावी, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

logo
marathi.freepressjournal.in