कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री गुरुवारी होणाऱ्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा करणार आहे. फिफा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतील कुवेतविरुद्ध गुरुवारी होणारा सामना हा छेत्रीच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरणार आहे. त्यामुळे भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान पटकावणाऱ्या सुनील छेत्रीला विजयी निरोप देण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू उत्सुक असतील.
भारतीय संघासाठी हा सामना काहीसा भावनिक ठरणार आहे. कुवेत हा संघ भारतापेक्षा सरस असल्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे, यजमान संघासाठी कठीण जाणार आहे. मात्र तरीही भारताने या सामन्यात विजय मिळवल्या, ते प्रथमच १८ संघांमध्ये होणाऱ्या पात्रता फेरीच्या अंतिम टप्प्यात पात्र ठरण्यासाठी दमदार पाऊल टाकतील. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना ‘करो अथवा मरो’ असाच असेल. बायच्युंग भूतियानंतर गेली दोन दशके भारतीय फुटबॉलचा कणा असलेला सुनील छेत्री कारकीर्दीच्या अखेरच्या सामन्यात सर्वस्व पणाला लावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमी कोलकातातील चाहते सॉल्ट लेक स्टेडियमवर तोबा गर्दी करतील.
भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या नावावर १५० आंतरराष्ट्रीय सामने व ९४ गोल आहेत. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये छेत्री हा ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सर्वाधिक गोल करणारा तिसरा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ठरला आहे.