हार्दिकचा पर्याय मिळणे कठीण; चार गोलंदाज नियमित खेळवा - गावस्कर

भारताला प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासारखा दुसरा खेळाडू शोधण्याच्या नादात अतिरेक करण्याची सवय असून, पंड्या हा पर्यायहीन आहे. त्यामुळे त्याच्यासारखा हुबेहूब खेळाडू शोधण्याऐवजी वेगवेगळ्या भूमिका पार पाडू शकणाऱ्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
हार्दिकचा पर्याय मिळणे कठीण; चार गोलंदाज नियमित खेळवा - गावस्कर
हार्दिकचा पर्याय मिळणे कठीण; चार गोलंदाज नियमित खेळवा - गावस्करX
Published on: 

नवी दिल्ली : भारताला प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासारखा दुसरा खेळाडू शोधण्याच्या नादात अतिरेक करण्याची सवय असून, पंड्या हा पर्यायहीन आहे. त्यामुळे त्याच्यासारखा हुबेहूब खेळाडू शोधण्याऐवजी वेगवेगळ्या भूमिका पार पाडू शकणाऱ्या खेळाडूंना संधी दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

तसेच भारताने फलंदाजीची लांबी वाढवण्यासाठी गोलंदाजीची ताकद कधीही कमी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेंगळुरू येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना शनिवारी रात्री पावसामुळे रद्द झाल्यानंतर जिओस्टारवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या मालिकेतील पाच सामने २-२ अशा बरोबरीत सुटले.

वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंचे उदाहरण देताना गावस्कर यांनी नमन धीरचा उल्लेख केला. नमन हा फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर आपले योगदान देत असल्याचे सांगत त्यांनी त्याचे कौतुक केले. पावसाने प्रभावित झालेल्या आणि केवळ ७.४ षटके खेळवता आलेल्या या मालिकेतील अखेरच्या सामन्यात नमनने ६ चेंडूंत नाबाद २४ धावांची खेळी केली होती.

“या मालिकेवरून भारताला एक मोठा धडा मिळाला असून, संघात किमान चार प्रमुख गोलंदाज खेळवणे गरजेचे आहे. पाचवा आणि सहावा गोलंदाज म्हणून फलंदाजी करू शकणारे अष्टपैलू खेळाडू असावेत. नमनसारखा फलंदाज जो दोन-तीन षटके टाकू शकतो किंवा आपले चार षटके पूर्ण करू शकणारा अक्षर पटेल संघात हवा,” असे गावस्कर म्हणाले.

हार्दिक जायबंदी असल्याने भारताने आतापर्यंत नमनसह नितीश रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर असे विविध अष्टपैलूंचे पर्याय पडताळून पाहिले आहेत. हार्दिक न्यूझीलंड दौऱ्यालाही दुखापतीमुळे मुकणार आहे.

आठव्या फलंदाजाचा अट्टाहास का?

फलंदाजीचा क्रम आठव्या क्रमांकापर्यंत नेण्याच्या नादात भारताची गोलंदाजी कमकुवत होते आणि तिथेच पराभवाचा सामना करावा लागतो, असा इशाराही त्यांनी दिला. बेंगळुरू येथील अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताला या कमी षटकांच्या सामन्यात आपली गोलंदाजी तपासण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याशिवाय फिरकी गोलंदाजांचे योग्य पर्याय शोधून त्यांना सातत्याने पाठिंबा देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in