मुल्लानपूर : अर्शदीप सिंगने (२९ धावांत ४ बळी) दिलेल्या हादऱ्यांनंतर २० वर्षीय नितीश रेड्डीने ३७ चेंडूंत ६४ धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध २० षटकांत ९ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची ३ बाद ३९ अशी स्थिती होती. अर्शदीपने ट्रेव्हिस हेड (२१), एडिन मार्करम (०) यांना माघारी पाठवले. अभिषेक शर्मा (१६) सॅम करनचा शिकार ठरला. मात्र आंध्र प्रदेशच्या नितीशने आयपीएल कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारताना ४ चौकार व ५ षटकार लगावले. त्याला अब्दुल समद (२५) आणि शाहबाज अहमद (नाबाद १४) यांनी अखेरीस चांगली साथ दिली.