प्ले-ऑफसाठी विजय अनिवार्य! सनरायजर्स हैदराबाद आज लखनऊ सुपर जायंट्सशी भिडणार

इंडियन प्रीमियर लीगचा थरार आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे.
प्ले-ऑफसाठी विजय अनिवार्य! सनरायजर्स हैदराबाद आज लखनऊ सुपर जायंट्सशी भिडणार

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगचा थरार आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी अव्वल संघांमध्ये चुरस लागली आहे. त्यातच आता प्ले-ऑफ फेरीत प्रवेश करण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना विजय अनिवार्य आहे. या उभय संघांमध्ये बुधवारी होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या सनरायजर्स आणि लखनऊ हे ११ सामन्यांत १२ गुणांसह चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. मात्र सनरायजर्सने (-०.०६५) सरासरीत लखनऊला (-०.३७१) मागे टाकले आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स (१६ गुण), राजस्थान रॉयल्स (१६ गुण) आणि चेन्नई सुपर किंग्ज (१२ गुण) या संघांनी अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे सनरायजर्स आणि लखनऊ यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाचे प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित होऊ शकते.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबादने यंदाच्या मोसमात अनेक दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारत विजय नोंदवले. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सनरायजर्सने नोंदवला. सनरायजर्सची प्रमुख भिस्त ही फलंदाजांवर असल्यामुळे काही वेळेला फलंदाज अपयशी ठरले की त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवते. सनरायजर्सला गेल्या चार सामन्यांत तीन वेळा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या गेल्या सामन्यातही फलंदाजांच्याच हाराकिरीमुळे त्यांना सात विकेट्सनी हार पत्करावी लागली.

ट्रेव्हिस हेडचा अपवाद वगळता सनरायजर्सच्या बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. युवा फलंदाज अभिषेक शर्मा याला गेल्या चार सामन्यांत फक्त एकदाच तिशीपार धावसंख्या नोंदवता आली आहे. सलामीवीर आपली कामगिरी चोखपणे पार पाडत नसल्यामुळे आता मधल्या फळीने फलंदाजीत योगदान देण्याची गरज आहे, असे सनरायजर्सचा प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीने मान्य केले आहे. धडाकेबाज फलंदाज हेन्रिच क्लासेन हासुद्धा आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. नितीश रेड्डी यालाही खराब फॉर्मची चिंता सतावत आहे.

गोलंदाजांनी मात्र फलंदाजांपेक्षा कामगिरीत सातत्य राखले आहे. टी. नटराजन याच्यासह भुवनेश्वर कुमार यानेही प्रभावी गोलंदाजी केली आहे. भुवनेश्वरच्या दमदार स्पेलमुळे सनरायजर्सने राजस्थान रॉयल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला होता. त्याचबरोबर पॅट कमिन्स आणि नितीश रेड्डी यांचेही गोलंदाजीत योगदान मिळत आहे.

दुसरीकडे, लखनऊने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध खराब कामगिरी केल्यामुळे इकाना स्टेडियमवर त्यांच्याविरुद्ध पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाने २००पेक्षा जास्त धावा कुटल्या. इतकेच नव्हे तर लखनऊचा डावही १३७ धावांवर गडगडला होता. या सामन्यात कर्णधार लोकेश राहुल याला चांगली कामगिरी करता आली नाहीत. त्याचबरोबर मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांसारखे अनुभवी खेळाडूसुद्धा या साामन्यात अपयशी ठरले. आयुष बदोनी यालाही फलंदाजीत योगदान देता आलेले नाही. लखनऊकडे प्रभावी गोलंदाज नसल्यामुळे त्यांच्या कामगिरीवर फार मोठा परिणाम दिसून येत आहे. वेगवान गोलंदाज मयांक यादवने आयपीएलमधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खान यालाही दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे युवा गोलंदाज यश ठाकूर, फिरकीपटू कृणाल पंड्या आणि रवी बिश्णोई यांना अधिक जबाबदारीने आपली भूमिका निभावावी लागत आहे.

प्रतिस्पर्धी संघ

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारूकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेन्रिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रह्मण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, विजयकांत वियासकांत.

लखनऊ सुपर जायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हूडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्णोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲॅश्टन टर्नर, डेव्हिड विली, अर्शद खान, मॅट हेन्री.

logo
marathi.freepressjournal.in