हेडचा शतकी तडाखा; हैदराबादचा विक्रमी धडाका

नाणेफेक जिंकून बंगळुरूचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र हेड व अभिषेक शर्मा यांनी अवघ्या ४८ चेंडूंत शतकी सलामी नोंदवली. हेडने २० चेंडूंतच अर्धशतक साकारले.
हेडचा शतकी तडाखा; हैदराबादचा विक्रमी धडाका

बंगळुरू : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या आयपीएल लढतीत सनरायजर्स हैदराबादने विक्रमी धडाका केला. ऑस्ट्रेलियन ट्रेव्हिस हेडच्या ४१ चेंडूंतील १०२ धावांच्या शतकी तडाखाच्या बळावर हैदराबादने २० षटकांत तब्बल ३ बाद २८७ धावांचा डोंगर रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या ठरली.

नाणेफेक जिंकून बंगळुरूचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र हेड व अभिषेक शर्मा यांनी अवघ्या ४८ चेंडूंत शतकी सलामी नोंदवली. हेडने २० चेंडूंतच अर्धशतक साकारले. अभिषेक २२ चेंडूंत ३४ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या हेनरिच क्लासेनने आणखी आक्रमण केले. क्लासेन व हेड यांनी दुसऱ्या विकेटसाठी २६ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी रचली. १२व्या षटकात हेडने वैशाखला चौकार लगावून अवघ्या ३९व्या चेंडूवर शतक पूर्ण केले. पुढच्याच षटकात तो बाद झाला. मात्र त्याने ९ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली.

त्यानंतर क्लासेनने २ चौकार व ७ षटकारांसह ३१ चेंडूंत ६७ धावा फटकावल्या. क्लासेन बाद झाल्यावर एडीन मार्करम व अब्दुल समद यांनी चौथ्या विकेटसाठी १८ चेंडूंतच ५६ धावांची भर घालून हैदराबादला विक्रमी धावसंख्या रचून दिली.

हैदराबादने आयपीएलमधील २८७ ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवताना स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. काही दिवसांपूर्वी मुंबईविरुद्ध हैदराबादने २७७ धावा केल्या होत्या. त्याशिवाय हैदराबादने डावात २२ षटकार लगावले. बंगळुरूने २०१३मध्ये पुण्याविरुद्ध २१ षटकार लगावले होते. तो विक्रमही हैदराबादने मोडला. आयपीएलमधील नीचांक धावसंख्येचा विक्रम (४९) बंगळुरूच्याच नावावर आहे.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती

  • राजस्थान - ६ - ५ - १ - १० - ०.७६७

  • कोलकाता - ५ - ४ - १ - ८ - १.६८८

  • चेन्नई - ६ - ४ - २ - ८ - ०.७२६

  • हैदराबाद - ५ - ३ - २ - ६ - ०.३४४

  • लखनऊ - ६ - ३ - ३ - ६ - ०.०३८

  • गुजरात - ६ - ३ - ३ - ६ --०.६३७

  • पंजाब - ६ - २ - ४ - ४ - -०.२१८

  • मुंबई - ६ - २ - ४ - ४ - -०.२३४

  • दिल्ली - ६ - २ - ४ - ४ --०.९७५

  • बंगळुरू - ६ - १ - ५ - २ - -१.१२४

(मुंबई वि. चेन्नई सामन्यापर्यंत)

logo
marathi.freepressjournal.in