अमेरिकेच्या गोलंदाजांविरुद्ध आफ्रिकन फलंदाजांचा कस! टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीला आजपासून प्रारंभ; लढतीवर पावसाचे सावट

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आता सुपर-८ फेरीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बुधवारी रात्री अँटिग्वा येथील सर व्हिव्हिएन रिचर्ड्स स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या गटातील पहिल्या सुपर-८ लढतीत दक्षिण आफ्रिकेसमोर अमेरिकेचे कडवे आव्हान असेल.
अमेरिकेच्या गोलंदाजांविरुद्ध आफ्रिकन फलंदाजांचा कस! टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीला आजपासून प्रारंभ; लढतीवर पावसाचे सावट

अँटिग्वा : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आता सुपर-८ फेरीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बुधवारी रात्री अँटिग्वा येथील सर व्हिव्हिएन रिचर्ड्स स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या गटातील पहिल्या सुपर-८ लढतीत दक्षिण आफ्रिकेसमोर अमेरिकेचे कडवे आव्हान असेल. या लढतीत प्रामुख्याने आफ्रिकन फलंदाज विरुद्ध अमेरिकेचे गोलंदाज यांच्यातील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळेल. मात्र या लढतीत २० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेने यंदाच्या विश्वचषकात साखळी फेरीत ड-गटात सलग ४ विजयांसह अग्रस्थान मि‌ळवले. मात्र यांपैकी दोन लढतींमध्ये आफ्रिकेला अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे आता आफ्रिकेला कामगिरी उंचावण्याची गरज असून आतापर्यंत एकाही सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी १२० पेक्षाही अधिक धावा केल्या नाहीत. अशा स्थितीत अमेरिकेच्या गोलंदाजांपुढे ते कसा खेळ करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे मोनांक पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अमेरिकेने अ-गटात धक्कादायक कामगिरी करताना दुसरे स्थान मिळवले. त्यांनी पाकिस्तानला हादरा दिला. तसेच भारतालाही विजयासाठी झुंजवले. अमेरिकेच्या संघात भारताच्या तब्बल ८ खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना फिरकीला पोषक खेळपट्टीवर खेळण्याची कला अवगत असून रिचर्ड्स स्टेडियम फलंदाजांसाठीसुद्धा नंदनवन ठरू शकते.

सांघिक कामगिरी अमेरिकेची ताकद

कर्णधार मोनांक, आरोन जोन्स, कोरी अँडरसन असे दमदार फलंदाज तसेच सौरभ नेत्रावलकर, हरमीत सिंग असे प्रतिभावान वेगवान गोलंदाज यांच्यामुळे अमेरिकेने आतापर्यंत चमकदार खेळ केला आहे. घरच्या मैदानात खेळताना त्यांना चाहत्यांचा पाठिंबाही लाभला. मात्र आता सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार असल्याने अमेरिकेची खरी कसोटी लागणार आहे. भारतात जन्मलेला डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकतो.

क्लासेन, मिलरपासून सावधान

हेनरिच क्लासेन व डेव्हिड मिलर हे आफ्रिकेच्या फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत. या दोघांनीही यंदाच्या विश्वचषकात आफ्रिकेल अनेकदा सावरले आहे. मात्र सलामीवीर क्विंटन डीकॉक, कर्णधार मार्करम, रीझा हेंड्रिक्स यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीत आनरिख नॉर्किए, कॅगिसो रबाडा, ओर्टनिल बार्टमन यांचे वेगवान त्रिकुट व तबरेझ शम्सी, केशव महाराज ही फिरकी जोडी आफ्रिकेसाठी चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या गोलंदाजांपासूनही अमेरिकेला सावध रहावे लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

>दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओर्टनिम बार्टमन, जेराल्ड कोएट्झे, क्विंटन डीकॉक, बोर्न फॉर्च्युन, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, आनरिख नॉर्किए, कॅगिसो रबाडा, रायन रिकेलटन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.

>अमेरिका : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स, आंद्रेस गस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेस्सी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोशतुष केनिगे, सौरभ नेत्रावलकर, शॅडली वॅन, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.

> वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

> थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in