सूर्यकुमार, अर्शदीप भारताचे हुकमी एक्के; रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचा विश्वास

लाड यांनी भारतीय संघाला रोहित शर्मासारखा मौल्यवान खेळाडू दिला असून, शार्दूल ठाकूरला घडवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे
सूर्यकुमार, अर्शदीप भारताचे हुकमी एक्के; रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचा विश्वास

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा हरहुन्नरी फलंदाज सूर्यकुमार यादव आणि पंजाबचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्शदीप सिंग भारतासाठी हुकमी एक्के ठरतील, असा विश्वास अनुभवी क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केला. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर लाड यांनी ‘नवशक्ति’शी खास बातचीत केली.

लाड यांनी भारतीय संघाला रोहित शर्मासारखा मौल्यवान खेळाडू दिला असून, शार्दूल ठाकूरला घडवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. गेली कित्येक वर्षे बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेतील क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या लाड यांना मुंबईतील शालेय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान आहे. ऑस्ट्रेलिया येथे १६ ऑक्टोबरापासून ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार असून, २२ ऑक्टोबरपासून सुपर-१२ फेरीला प्रारंभ होईल. २३ ऑक्टोबर रोजी भारताची पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. “खरे सांगायचे तर, ट्वेन्टी-२० हा प्रकार इतका धोकादायक आहे की याविषयी मी फारसे भाकीत व्यक्त करणे टाळतो. त्यातच अमुक एखादा संघ जिंकेल, हे कोणीही खात्रीने सांगू शकत नाही, मात्र वैयक्तिक पातळीवर काही खेळाडू नक्कीच भारतासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतील. सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग हे त्यांपैकीच आहेत,” असे लाड म्हणाले.

“सध्याचा भारतीय संघ फक्त आघाडीच्या तीन फलंदाजांवर अवलंबून नाही. रोहित, के. एल. राहुल आणि विराट कोहली कधी एकाच लढतीत अपयशी ठरले तरी मधल्या फळीत सूर्यकुमार, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक अपेक्षित धावगती राखून संघाला सावरूही शकतात. विशेषत: सूर्यकुमार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धावा करत आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर तो कसा खेळतो, हे पाहण्यासाठी मी आतुर आहे,” असे लाड यांनी सांगितले.

“जसप्रीत बुमराह नसल्याने भारताला वेगाने मारा करणाऱ्या गोलंदाजांची नक्कीच उणीव भासेल. त्याच्या जागी मोहम्मद शमीचाच समावेश करण्यात येण्याची शक्यता अधिक आहे, मात्र अर्शदीप सिंगच्या रूपात डावखुऱ्या गोलंदाजाचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. त्याच्याकडे फलंदाजाला धडकी भरवणारी गती नसली तरी स्विंग आणि अचूक टप्पा टाकण्याची कुवत आहे. त्याला प्रत्येक लढतीत संधी मिळणे गरजेचे आहे,” असेही लाड यांनी नमूद केले.

दरम्यान, ट्वेन्टी-२० विश्वचषकात कोणते संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारतील, याचे उत्तर देणे लाड यांनी टाळले. संघ व्यवस्थापनाने निवडलेले भारताचे १५ खेळाडू उत्तम असून, त्यांना आयपीएलचा उत्तम अनुभव आहे. त्यांना फारसे काही सांगण्याची गरज नसून त्यांनी योग्य वेळी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे, असे लाड यांनी अखेरीस आवर्जून नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in