पायाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटपासून दूर!

भारताचा अनुभवी अष्टपैलू व टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात परतू शकतो.
पायाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटपासून दूर!
PM

नवी दिल्ली : भारताचा तारांकित फलंदाज सूर्यकुमार यादव पायाच्या दुखापतीमुळे फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे तो जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेला मुकणार आहे.

आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमारच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला यातून सावरण्यासाठी किमान ६ आठवडे लागतील. सूर्यकुमार आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नव्हता. मात्र टी-२० मालिकेत त्याने भारताचे कर्णधारपद भूषवले. आता जानेवारीत अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून तेव्हा सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व कोण करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

“सूर्यकुमारला दुखापतीतून सावरण्यासाठी किमान ५ ते ६ आठवडे लागतील. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल होणार आहे,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. सध्या सूर्यकुमार कुटुंबीयांसह लंडन येथे आहे.

जूनमध्ये टी-२० विश्वचषक रंगणार असून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इंग्लंडचा संघ भारतात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार शक्यतो भारताच्या कसोटी संघाचा भाग नसल्याने आता तो थेट मार्चअखेरीस आयपीएलमध्येच खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

हार्दिक तंदुरुस्तीच्या मार्गावर

भारताचा अनुभवी अष्टपैलू व टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात परतू शकतो. काही दिवसांपूर्वी हार्दिक पायाच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसह आयपीएललाही मुकणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र हार्दिकशी संपर्कात असलेल्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त खोटे आहे. हार्दिक उत्तमरित्या सावरला असून तो आयपीएल तसेच अफगाणिस्तानविरुद्ध नक्की खेळेल, असे समजते. ११, १४ व १७ जानेवारी रोजी भारत-अफगाणिस्तान यांच्यात ३ टी-२० होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in