
मुंबई : भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टी-२० मुंबई लीग २०२५च्या पहिल्याच दिवशी २५ चेंडूंत वादळी अर्धशतक झळकावले. पण, साईराज पाटीलने वादळी खेळी करताना इगल ठाणे स्ट्रायकर्सला डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे झालेल्या लढतीत ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टसाठी सूर्यकुमार (५०) आणि जिगर राणा (५३) यांनी चांगली खेळी केली. त्याच्या जोरावर नाईट्सने ७ बाद १७९ धावा केल्या. संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही, परंतु राणा आणि परिक्षित वलसंगकर यांनी ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून डाव सावरला. राणा संथ चेंडूवर बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात परिक्षित धावबाद झाला, तेव्हा सूर्यकुमारने संघाची सूत्रे हाती घेतली.
भारताच्या या स्टार खेळाडूला जय जैनची (२४) चांगली साथ मिळाली. या जोडीने मधल्या षटकांमध्ये ४० धावा जोडल्या आणि डाव स्थिर ठेवला. अमित पांडेने ही जोडी तोडली आणि यष्टीरक्षक अनिश चौधरीने जैनला यष्टिचीत केले. सूर्यकुमारने डेथ ओव्हर्समध्ये सुरेख फटकेबाजी करून नाईट्सना मजबूत फिनिशिंगपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरादाखल, वरुण लवांडेने ३८ चेंडूत ५७ धावा करत स्ट्रायकर्सचा पाठलाग सुरू ठेवला आणि अर्ध्या धावसंख्येपर्यंत त्यांना ८९/१ अशी मजबूत धावसंख्या गाठून दिली. अनिश (३७) सोबत त्याने ७३ धावांची भागीदारी करून एक भक्कम पाया रचला, परंतु नाईट्सने दोन जलद विकेट्स घेतल्यानंतर हा वेग काही काळासाठी कमी झाला. साईराज पाटीलच्या येण्याने स्ट्रायकर्स स्पर्धेत टिकून राहिले आणि त्याने २२ चेंडूंत नाबाद ४७ धावा करताना चार षटकार मारत संघाला विजयी केले.
देशभरातील सर्वोत्तम घरगुती टी-२० लीगपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.