सूर्यकुमार, रौफवर दंडात्मक कारवाई; फरहानला ताकीद

भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानला मात्र फक्त ताकीद देण्यात आली आहे.
सूर्यकुमार, रौफवर दंडात्मक कारवाई; फरहानला ताकीद
Photo : X
Published on

दुबई : भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानला मात्र फक्त ताकीद देण्यात आली आहे.

पाकिस्तानविरुद्ध १४ तारखेला झालेल्या साखळी सामन्यानंतर सूर्यकुमारने प्रेझेंटेशनदरम्यान भारतीय सैन्यदलाचे आभार मानले होते. तसेच पाकिस्तानविरुद्धचा विजय त्यांना समर्पित करतानाच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असे मत व्यक्त केले होते. याविरोधात पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आयसीसीकडे तक्रार नोंदवली होती. भारतीय खेळाडूंनी दोन्ही वेळेस पाकिस्तानशी हस्तांदोलन केले नाही.

त्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सूर्यकुमारला राजकीय स्वरूपाची कोणतीही टिप्पणी करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्याच्या सामन्याच्या मानधनातून ३० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने याविरोधात अपील केले आहे. त्यामुळे आयसीसी पुन्हा याबाबत सुनावणी करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, रौफने सुपर-फोर फेरीत भारताविरुद्धच्या लढतीत विमान पाडल्याचे हातवारे केले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यावेळी पाकिस्तानने भारतीय सैन्याची सहा राफेल विमाने पाडल्याचा दावा करण्यात आला होता. रौफने हेच आपल्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांच्याशी त्याची शाब्दिक चकमकही झाली होती. त्यामुळे रौफवरही आयसीसीने दंडात्मक कारवाई केली असून त्याच्या सामन्याच्या मानधनातून ३० टक्के रक्कम कापण्यात आली आहे.

पाकिस्तानचा सलामीवीर फरहानने त्याच सुपर-फोर लढतीत अर्धशतक झळकावल्यावर बॅटचा बंदुकीसारखा वापर करून गोळी झाडल्याची कृती केली होती. फरहानने याचा कोणत्याही अन्य गोष्टीशी संबंध धरू नये, असे म्हटले होते. सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी त्याला यावेळी फक्त ताकीद दिली असून पुढील वेळेस असे कोणतेही कृत्य केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी समज दिली.

एकूणच आता रविवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान संघांच्या खेळाडूंत पुन्हा शाब्दिक द्वंद्व पाहायला मिळणार का, याची चाहत्यांना उत्सुकता लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in