IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

मालिका आधीच खिशात घातल्यामुळे अखेरच्या सामन्यात अन्य खेळाडूंना संधी देण्याचा पर्याय भारताकडे आहे.
IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?
Published on

हैदराबाद: बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने खिशात घालून यजमान भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा सामना आज (शनिवारी) हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना खिशात घालून पाहुण्यांना क्लीन स्विप देण्याचे लक्ष्य सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाचे असेल.

कसोटी मालिकेत बांगलादेशला २-० असा व्हाईटवॉश दिल्यानंतर टी-२० मालिकेतही भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवून कसोटी पाठोपाठ टी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळविण्याचे ध्येय भारतीय संघाचे असेल.

रवी बिश्नोई, तिलक वर्मा यांना संधी मिळणार?

दुसऱ्या टी-२० सामन्यात पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्यानंतरही भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. नितीशकुमार रेड्डी आणि रिकू सिंग यांनी चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला धावांचा डोंगर उभारता आला. मालिका आधीच खिशात घातल्यामुळे अखेरच्या सामन्यात अन्य खेळाडूंना संधी देण्याचा पर्याय भारताकडे आहे. बेंच स्ट्रेंथची ताकद आजमावण्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरचा विचार असेल. त्यामुळे रवी बिश्नोई, तिलक वर्मा, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना अखेरच्या सामन्यात संधी मिळू शकते. असे झाल्यास या चौघांसाठी कोणत्या चार खेळाडूंना वगळले जाते हेही बघावे लागणार आहे.

मयंक, वरुण यांच्यावर नजरा

वेगवान गोलंदाज मयक यादव असो किंवा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती असो, भविष्यातील सामने लक्षात येता मुख्य प्रशिक्षक गौतम गभीर या खेळाडूवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मयंक यादवने आपल्या वेगाने अचंबित केले आहे. वरुणने ग्वाल्हेर सामन्यात तीन बळी घेऊन लक्ष वेधून घेतले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नितीशकुमार रेड्डीने दोनही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून अखेरच्या सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

अनुभवी खेळाडूंवर बांगलादेशची भिस्त

बांगलादेशला या दौऱ्यात अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यासाठी त्यांना या सामन्यात सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील, विशेषतः कर्णधार नजमुल हुसेन शांतो, लिटन दास आणि मुस्तफिजूर रहमान यांसारख्या अनुभवी खेळाडूंकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या खेळाडूंनी आतापर्यंत निराश केले आहे. अष्टपैलू महमुदुल्लाचा हा अखेरचा टी-२० सामना आहे. या सामन्यात विजय मिळवून वलीन स्विप वाचविण्यासह महमुदुल्लाला विजयी निरोप देण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल.

वेळ : सायकाळी ७ वाजल्यापासून, थेट प्रक्षेपण स्पोर्टस १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा अॅप

logo
marathi.freepressjournal.in