टीम इंडियाने रविवारी (१४ डिसेंबर) धर्मशाळा येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ११७ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात, भारताने १५.५ षटकांत ११८ धावांचे लक्ष्य गाठले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सामना जिंकला असला तरीही सूर्यकुमारचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनत आहे.
सूर्यकुमारने बऱ्याच काळापासून मोठी खेळी केली नाही. मालिकेतील तीन सामन्यांमध्ये त्याने १२, ५ आणि १२ धावा केल्या आहेत. गेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. परिणामी, काही क्रिकेट विश्लेषकांनी त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. धर्मशाळा टी-२० सामन्यानंतर, त्याने त्याच्या खराब फॉर्मबद्दल उघडपणे सांगितले. त्याने म्हटले केले की "मी धावा करु शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की मी आउट ऑफ फॉर्म आहे."
मी आउट ऑफ फॉर्म नाही...
खराब फॉर्मवर प्रश्न विचारले असता, सूर्यकुमार म्हणाला की, "मी नेट्समध्ये उत्तम फलंदाजी करत आहे. मी माझ्या हातात असलेल्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा सामन्यात धावांची गरज असेल तेव्हा धावा नक्कीच येतील. पण हो, मला धावा करायच्या आहेत. मी आउट ऑफ फॉर्म नाही, परंतु, मी धावा करु शकलो नाही. आज रात्री आम्ही हा विजय साजरा करु. उद्या लखनौला पोहोचल्यानंतर, आम्ही एकत्र बसून या सामन्यात नक्की काय घडलं यावर चर्चा करू."
तिसऱ्या सामन्यातील विजयाबद्दल बोलताना, ३५ वर्षीय खेळाडू म्हणाला, "मला वाटते की खेळ तुम्हाला खूप काही शिकवतो. तुम्ही मालिकेत कसे कमबॅक करता हे अधिक महत्त्वाचे आहे आणि आम्ही तेच केले. आम्ही गेल्या सामन्यातून खूप काही शिकलो. कटकमध्ये आम्ही ज्या गोष्टी केल्या होत्या त्याच गोष्टी आम्ही सराव सत्रात करण्याचा प्रयत्न केला आणि निकाल संघाच्या बाजूने लागला. गोलंदाजासह चांगली टीम मीटिंग झाली. आम्ही पुन्हा बेसिक गोष्टींकडे वळलो. आम्ही खूप वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मला वाटते की, त्यावेळी वेगळे प्रयोग करण्यापेक्षा बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या."
सूर्यकुमारची निराशाजनक कामगिरी
सूर्यकुमार यादवने गेल्या २१ टी-२० सामन्यांमध्ये ११८.९० च्या स्ट्राईक रेटने फक्त २३९ धावा केल्या आहेत. त्याने, २०२५ मध्ये खेळलेल्या २० सामन्यांमध्ये २१३ धावा केल्या. २० सामन्यांमध्ये, सूर्यकुमारने फक्त दोनदा ३० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४७ आहे. या काळात त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही.