नवी दिल्ली : अखेर भारताच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार कोण, याचे उत्तर तमाम चाहत्यांना गुरुवारी मिळाले. चौफेर फटकेबाजी करणारा ३३ वर्षीय मुंबईकर सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेपासून भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याशिवाय रोहित शर्मा, विराट कोहली यांनी एकदिवसीय मालिकेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० व एकदिवसीय मालिकेसाठी गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन्ही संघ जाहीर केले.
रोहित, विराट रवींद्र जडेजा या त्रिकुटाने टी-२० विश्वचषक जेतेपदानंतर निवृत्ती पत्करली. त्यामुळे भारताला आता नव्याने टी-२० प्रकारात संघबांधणी करायची आहे. तसेच राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळही टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात आल्यामुळे आता गौतम गंभीरच्या प्रशिक्षण पर्वाला प्रारंभ होईल. २६ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात प्रत्येकी ३ टी-२० व ३ एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात येईल, अशी शक्यता होती. टी-२० विश्वचषकात हार्दिकच भारताचा उपकर्णधार होता.
मात्र हार्दिकची तंदुरुस्ती आणि त्याच्यावरील खेळाच्या ताणाचा (वर्कलोड मॅनेजमेंट) करता सूर्यकुमारकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघ जाहीर करण्यापूर्वी हार्दिकशी संवाद साधून त्याला याविषयी कल्पना दिली, असे समजते. सूर्यकुमारने गतवर्षी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचे यशस्वी नेतृत्व केले. आयपीएलमध्येही त्याने काही लढतीत यापूर्वी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. तसेच रणजीमध्येही त्याला नेतृत्वाचा अनुभव आहे. २०२६मध्ये भारतात टी-२० विश्वचषक होणार असल्याने तोपर्यंत सूर्यकुमारच भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असेल, असे समजते.
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध नुकताच झालेल्या टी-२० मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने ४-१ असे यश संपादन केले. त्यामुळे गिलकडे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दिककडे येथेही दुर्लक्ष करण्यात आल्याने काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याशिवाय महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि धडाकेबाज शतक झळकावणारा अभिषेक शर्मा यांनाही टी-२० संघात स्थान लाभलेले नाही.
एकदिवसीय संघाचा विचार करता गंभीरच्या विनंतीवरून विराट व रोहित यांनी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बुमराला मात्र एकदिवसीय मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली आहे. के. एल. राहुल व श्रेयस अय्यर एकदिवसीय संघात परतले असून आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळताना छाप पाडणारा हर्षित राणाही या संघात आहे. प्रतिभावान फलंदाज रियान परागला दोन्ही संघांत स्थान देण्यात आले आहे.
भारत-श्रीलंका यांच्यात २६, २७ व २९ जुलै रोजी पालेकेले येथे टी-२०, तर १, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे एकदिवसीय सामने खेळवण्यात येतील. टी-२० सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७, तर एकदिवसीय सामने दुपारी २.३० वाजता सुरू होतील. २०२१नंतर प्रथमच भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मायदेशातच २ कसोटी व ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी खेळून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जाईल. तेथूनच मग नोव्हेंबरच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे.
अनपेक्षित निर्णय कोणते?
अनुभवी हार्दिककडे टी-२० अथवा एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपदही न देता शुभमन गिलकडे दोन्ही प्रकारांत ही जबाबदारी.
सूर्यकुमार आणि हार्दिक यांना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत छाप पाडूनही ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांना टी-२० संघातून डच्चू.
रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघात स्थान नाही. राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन.
रियान परागला दोन्ही मालिकांसाठी संधी; हर्षित राणाचा एकदिवसीय संघात समावेश.
भारताचा टी-२० संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.