
नवी दिल्ली : राष्ट्रीय संघ निवड चाचणीदरम्यान १० मार्च रोजी उत्तेजक चाचणीसाठी नुमना देण्यास नकार केल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) कुस्तीपटू बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केले आहे. मात्र आपल्यावरील कारवाई ही सूडभावनेने करण्यात आली आहे. जर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तर माझ्यावरील निलंबन रद्द होईल, अशी प्रतिक्रिया बजरंगने व्यक्त केली.
नमुना देण्यास नकार दिल्याने यापूर्वी जागतिक संयुक्त कुस्ती महासंघाने कारवाई केल्यानंतर नाडाने २३ एप्रिल रोजी प्रथम बजंरगला निलंबित केले. या कारवाईला बजरंगने ‘नाडा’च्या शिस्तभंग समितीकडे आव्हान दिले होते. तेव्हा समितीने बजरंगवरील निलंबन उठविण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर २३ जूनला ‘नाडा’ने नव्याने बजरंगला नोटिस बजावली. या करावाईलाही बजरंगने पुन्हा शिस्तभंग समितीकडे आव्हान दिले होते. मात्र, २० सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर समितीने बजंरगला दोषी ठरवले आणि ‘नाडा’ने त्याच्यावर चार वर्षाच्या बंदीची कारवाई केली. त्यामुळे बजरंगची कारकीर्द जवळपास संपली आहे, असे म्हणू शकतो.
३० वर्षीय बजरंग यंदा पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरू शकला नव्हता. त्यानंतर बजरंगने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. “मी नमुना देण्यास नकार दिलेला नाही. मी केवळ मुदत संपलेले साहित्य का आणले, इतकाच प्रश्न नाडाच्या अधिकाऱ्यांना विचारला. मात्र याचे उत्तर मला अद्याप मिळालेले नाही,” असे बजरंग म्हणाला.
“आम्ही महिला कुस्तीपटूंच्या विरोधात लढा दिला. तसेच केंद्र शासनावरही निशाणा साधला. त्यामुळेच आमच्यावर या मार्गाने सूड घेतला जात आहे. मात्र मी हार मानणार नाही,” असेही बजरंगने नमूद केले.
“आम्ही महिला कुस्तीपटूंच्या विरोधात लढा दिला. तसेच केंद्र शासनावरही निशाणा साधला. त्यामुळेच आमच्यावर या मार्गाने सूड घेतला जात आहे. मात्र मी हार मानणार नाही,” असेही बजरंगने नमूद केले.