स्विआनटेकला पराभवाचा धक्का; बिगरमानांकित लिंडा नोस्कोव्हाकडून आव्हान संपुष्टात, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा

स्विआनटेक हिला नोस्कोव्हा हिच्याकडून ६-३, ३-६, ४-६ अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे पहिले आणि एकूण पाचवे ग्रँडस्लॅम जेतेपदापासून वंचित राहावे लागले.
स्विआनटेकला पराभवाचा धक्का; बिगरमानांकित लिंडा नोस्कोव्हाकडून आव्हान संपुष्टात, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा
Published on

मेलबर्न : अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या इगा स्विआनटेक हिला ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित लिंडा नोस्कोव्हा हिने स्विआनटेकची १८ सामन्यांची विजयी मालिका खंडित केली.

स्विआनटेक हिला नोस्कोव्हा हिच्याकडून ६-३, ३-६, ४-६ अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे पहिले आणि एकूण पाचवे ग्रँडस्लॅम जेतेपदापासून वंचित राहावे लागले. पोलंडची स्विआनटेक पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर आरामात चौथ्या फेरीत मजल मारेल, असे वाटले होते. पण जागतिक क्रमवारीत ५०व्या स्थानी असलेल्या नोस्कोव्हाने पुढील दोन्ही सेट जिंकून तिची विजयी घोडदौड संपुष्टात आणली. आता टॉप-१०मधील फक्त तीन अव्वल महिला टेनिसपटूंना आगेकूच करता आली आहे.

पुरुषांमध्ये, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या डॅनिल मेदवेदेव याने फेलिक्स ऑगर-अलिसिमे याच्यावर ६-३, ६-४, ६-३ अशी मात करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याची पुढील फेरीत पोर्तुगालच्या नुनो बोर्गेस याच्याशी गाठ पडेल. बोर्गेसने १३व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह याचा ६-७ (३), ६-४, ६-२, ७-६ (६) असा फडशा पाडला. फ्रान्सच्या आर्थर कझाक्स याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पदार्पणातच २८व्या मानांकित टॅलन ग्रिकस्पूर याच्यावर ६-३, ६-३, ६-१ असा सहज विजय मिळवत चौथी फेरी गाठली आहे.

महिलांमध्ये दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेंकाने ११व्या मानांकित येलेना ओस्टापेंको हिच्यावर ६-१, ७-५ अशी सरळ दोन सेटमध्ये सरशी साधत चौथ्या फेरीत मजल मारली. २० वर्षीय कार्लोस अल्काराझ याने जेरी शँग याच्याविरुद्धची लढत जिंकून चौथी फेरी गाठली. जेरी शँग याला उजव्या पायाला दुखापत झाल्याने माघार घ्यावी लागली.

logo
marathi.freepressjournal.in