लखनौ : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या भारतीय जोडीने रविवारी सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा महिला दुहेरीचे जेतेपद काबिज केले. मात्र पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
३०० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात २२ वर्षीय ट्रीसा व २२ वर्षीय गायत्री यांच्या जोडीने काहो ओसावा आणि मै टनाबे या जपानच्या जोडीला १७-२१, २१-१३, २१-१५ असे तीन गेममध्ये नमवले. गतवर्षीसुद्धा ही स्पर्धा जिंकणाऱ्या ट्रीसा-गायत्रीने यावेळी १ तास आणि १६ मिनिटांच्या झुंजीनंतर अंतिम लढत जिंकली. एकंदर या जोडीचे हे वरिष्ठ पातळीवरील तिसरे जेतेपद ठरले. त्यांनी २०२२मध्ये ओदिशा ओपन स्पर्धा जिंकलेली आहे.
दुसरीकडे पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत हाँगकाँगच्या जेसन गुनावानने ३२ वर्षीय श्रीकांतवर २१-१६, ८-२१, २०-२२ अशी मात केली. त्यामुळे श्रीकांतचा गेल्या आठ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ कायम आहे. श्रीकांतने २०१७मध्ये फ्रेंच ओपनच्या रुपात अखेरची स्पर्धा जिंकलेली आहे. तसेच २०२५ या वर्षात तो मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र जेतेपदाने हुलकावणी दिली.
दरम्यान, एकंदर ही स्पर्धा भारतीयांच्या दृष्टीने उत्तम ठरली. महिला एकेरीत भारताच्या उन्नती हूडा व तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तसेच पुरुष एकेरी व महिला दुहेरीत भारताचे खेळाडू अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. ट्रीसा-गायत्रीने भारतातर्फे २०२५ या वर्षातील तिसरे जेतेपद मिळवले. यापूर्वी आयुष शेट्टी (यूएस ओपन) व लक्ष्य सेन (ऑस्ट्रेलियन ओपन) यांनीच २०२५ या वर्षात वरिष्ठ पातळीवरील स्पर्धा जिंकलेली आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक जिंकता आले नव्हते. तसेच सात्विक-चिराग यांचाही यावेळी संघर्ष चालू आहे. त्यामुळे महिला दुहेरीत व पुरुष एकेरीत युवा खेळाडूंनी मिळवलेले जेतेपद भविष्याच्या दृष्टीने आश्वासक असून यामध्ये आणखी भर पडले, हीच अपेक्षा आहे.