Syed Mushtaq Ali Trophy: आयुषचे पुन्हा शतकी वादळ; मुंबईची विजयी हॅटट्रिक

भारताच्या युवा संघाचा कर्णधार आणि १८ वर्षीय प्रतिभावान फलंदाज आयुष म्हात्रेचे (५९ चेंडूंत नाबाद १०४ धावा) रविवारी पुन्हा एकदा शतकी वादळ घोंघावले. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साकारताना आंध्र प्रदेशचा ९ गडी व २८ चेंडू राखून धुव्वा उडवला.
आयुषचे पुन्हा शतकी वादळ; मुंबईची विजयी हॅटट्रिक
आयुषचे पुन्हा शतकी वादळ; मुंबईची विजयी हॅटट्रिकPhoto- X (Johns. @CricCrazyJohns)
Published on

लखनौ : भारताच्या युवा संघाचा कर्णधार आणि १८ वर्षीय प्रतिभावान फलंदाज आयुष म्हात्रेचे (५९ चेंडूंत नाबाद १०४ धावा) रविवारी पुन्हा एकदा शतकी वादळ घोंघावले. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी हॅटट्रिक साकारताना आंध्र प्रदेशचा ९ गडी व २८ चेंडू राखून धुव्वा उडवला.

लखनौच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या लढतीत विदर्भाने दिलेले १६० धावांचे लक्ष्य मुंबईने १५.२ षटकांत अवघ्या एका फलंदाजाच्या मोबदल्यात गाठले. विरारच्या आयुषने टी-२० कारकीर्दीतील दुसरे शतक साकारताना ५ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली. आयुषने दोन दिवसांपूर्वीच विदर्भाविरुद्ध नाबाद ११० धावा फटकावल्या होत्या. आयुषच्या शतकामुळे मुंबईने तीन सामन्यांत तिसरा विजय नोंदवून अ-गटात अग्रस्थान पटकावले. आता मुंबईची पुढील लढत २ डिसेंबर रोजी आसामशी होईल.

दरम्यान, २६ नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांत मुश्ताक अली ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा सुरू झाली. रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्व संघांचे पाच साखळी सामने झाल्यावर आता मुश्ताक अली व त्यानंतर विजय हजारे ही देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळवण्यात येईल. मुंबईचा संघ हा मुश्ताक अली स्पर्धेचा गतविजेता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपद मिळवले होते. मात्र यंदा श्रेयस जायबंदी असल्याने शार्दूल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करत आहे.

रणजीप्रमाणेच या स्पर्धेतही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उरलेल्या सहा संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. अ-गटात मुंबईसह केरळ, छत्तीसगड, विदर्भ, आंध्र प्रदेश, रेल्वे, ओदिशा, आसाम अशा एकूण आठ संघांचा समावेश आहे. मुंबईपुढे यंदा जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. पहिल्या लढतीत मुंबईने रेल्वेवर मात केली, मग दुसऱ्या सामन्यात विदर्भाचा धुव्वा उडवला.

रविवारी झालेल्या तिसऱ्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशने २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने ३ बळी मिळवले. कर्णधार रिकी भुई (४८) व एस. प्रसाद (नाबाद ४४) यांनी आंध्रकडून कडवा प्रतिकार केला. मग लक्ष्याचा पाठलाग करताना आयुषने अजिंक्य रहाणेसह (१८) ३४ चेंडूंत ५७ धावांची सलामी नोंदवली. रहाणे बाद झाल्यावर मग भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह आयुषने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची अभेद्य भागीदारी रचून १६व्या षटकातच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्याने २१ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या.

logo
marathi.freepressjournal.in