

कोलकाता : अष्टपैलू साईराज पाटीलच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा १८ धावांनी पराभव केला. मुंबईनेही ड-गटात सलग तिसरा विजय नोंदवला. आता मुंबईची पुढील लढतीत विदर्भाशी गाठ पडेल.
मुंबईकडून मुशीर खानने २७ चेंडूंत सर्वाधिक ४४ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २५, शिवम दुबेने २३, तर सर्फराज खानने १६ धावांचे योगदान दिले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साईराजने अवघ्या २१ चेंडूंत ४० धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे मुंबईला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. मात्र, मुंबईचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत २०७ धावांवर बाद झाला. त्यानंतर मुंबईने गोव्याला १९ षटकांत १८९ धावांत गुंडाळले. साईराजनेच १९व्या षटकात ललित यादवसह तिघांना बाद करून मुंबईचा विजय साकारला. ललितने ४१ चेंडूंत ८१ धावांची झुंज दिली.
अन्य लढतीत शुभम दुबे आणि वरुण बिश्त यांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर विदर्भाने हैदराबादवर तीन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. गट ड मधील या सामन्यात आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दुबे आणि बिश्त यांनी अवघ्या १० चेंडूंत ३२ धावा कुटत विदर्भाला विजय मिळवून दिला.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १९५ धावांचे आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरात विदर्भाची अवस्था १६६ धावांवर सात बाद अशी झाली होती. विजयासाठी अखेरच्या १४ चेंडूंत ३० धावांची गरज होती. अशा कठीण परिस्थितीत बिश्त आणि दुबे यांनी आक्रमक फलंदाजी करत सामन्याचे चित्रच पालटले.
बिश्तने अवघ्या सहा चेंडूंचा सामना करत तीन उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद २२ धावा केल्या. दुसरीकडे, दुबेने सहा चेंडूंत एक चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद १५ धावा केल्या. या दोघांच्या फटकेबाजीमुळे विदर्भाने तीन गडी राखून विजय मिळवला. सलामीवीर अथर्व तायडेनेही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ईडन गार्डन्सवर ४५ चेंडूंत ८२ धावांची शानदार खेळी केली. विदर्भाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला.
आगामी आयपीएलचा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे. त्याच्या अवघ्या दहा दिवस आधी या स्पर्धेची सांगता होणार असल्याने फ्रँचायझींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. नव्या खेळाडूंचा शोध घेण्याबरोबरच संघातील कमकुवत जागा भरून काढण्यासाठी फ्रँचायझींना ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.