रहाणेचा बडोद्याला तडाखा; मुंबईची अंतिम फेरीत धडक

Syed Mushtaq Ali Trophy: अनुभवी सलामीवीर अजिंक्य रहाणेने शुक्रवारी आणखी एक धडाकेबाज खेळी साकारताना ५६ चेंडूंत ९८ धावा फटकावल्या.
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ४३२ धावांसह रहाणेने अग्रस्थान काबिज केले. यामध्ये ७ सामन्यांतील ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ४३२ धावांसह रहाणेने अग्रस्थान काबिज केले. यामध्ये ७ सामन्यांतील ५ अर्धशतकांचा समावेश आहे.एक्स (Rokte_Amarr_KKR)
Published on

बंगळुरू : अनुभवी सलामीवीर अजिंक्य रहाणेने शुक्रवारी आणखी एक धडाकेबाज खेळी साकारताना ५६ चेंडूंत ९८ धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईने बडोद्याचा ६ गडी आणि १६ चेंडू राखून धुव्वा उडवत सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. २०२२च्या विजेत्या मुंबईने दुसऱ्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता रविवारी त्यांची जेतेपदाच्या लढतीत मध्य प्रदेशशी गाठ पडेल.

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बडोद्याने २० षटकांत ७ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली. शिवालिक शर्मा (२४ चेंडूंत नाबाद ३६), कृणाल (३०) व शाश्वत रावत (३३) यांनी बडोद्याकडून कडवा प्रतिकार केला. हार्दिक पंड्या (५) अपयशी ठरला. मुंबईसाठी सूर्यांश शेडगेने दोन, तर मोहित अवस्थी, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने मात्र १७.२ षटकांतच आरामाज विजय मिळवला. हार्दिकच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ (८) लवकर माघारी परतला. मात्र ३६ वर्षीय रहाणे व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. रहाणेने सलग तिसरे व स्पर्धेतील पाचवे अर्धशतक झळकावताना ११ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी केली. श्रेयसनेही ४ चौकार व ३ षटकारांसह ३० चेंडूंतच ४६ धावा केल्या. श्रेयस बाद झाल्यावर रहाणेला शतकाची संधी होती. मात्र तो ९८ धावांवर माघारी परतला. सूर्यकुमार यादवही पुढच्याच षटकात शून्यावर बाद झाला. अखेर १८व्या षटकात सूर्यांशने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

रविवारी दुपारी ४.३० वाजता चिन्नास्वामी येथेच अंतिम सामना खेळवण्यात येईल. अंतिम फेरीत मुंबईचे प्रशिक्षक ओमकार साळवी व मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित अशा मराठमोळ्या प्रशिक्षकांमधील द्वंद्वही पाहायला मिळेल. मुंबईने या स्पर्धेत इ-गटात अग्रस्थान काबिज करून आगेकूच केली. उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी विदर्भाला धूळ चारली.

संक्षिप्त धावफलक

बडोदा : २० षटकांत ७ बाद १५८ (शिवालिक शर्मा नाबाद ३६, शाश्वत रावत ३३, कृणाल पंड्या ३०; सूर्यांश शेडगे २/११) पराभूत वि.

मुंबई : १७.२ षटकांत ४ बाद १६४ (अजिंक्य रहाणे ९८, श्रेयस अय्यर ४६; अतित सेठ १/३९)

सामनावीर : अजिंक्य रहाणे

पाटिदारमुळे मध्य प्रदेश विजयी

कर्णधार रजत पाटिदारने २९ चेंडूंत नाबाद ६६ धावांची झंझावाती खेळी साकारली. त्यामुळे मध्य प्रदेशने दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिल्लीचा ७ गडी आणि २६ चेंडू राखून फडशा पाडला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ५ बाद १४६ धावा केल्या. अनुज रावतने सर्वाधिक नाबाद ३३ धावा केल्या. वेंकटेश अय्यरने २ बळी मिळवले. मग ३ बाद ४६ स्थितीतून हरप्रीत सिंग (नाबाद ४६) व पाटिदार यांनी चौथ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचून १५.४ षटकांतच संघाचा विजय साकारला. मध्य प्रदेशने एकदाही मुश्ताक अली स्पर्धा जिंकलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in