Syed Mushtaq Ali Trophy 2026 : मुशीर खानची अष्टपैलू चमक; मुंबईचे सलग विजयांचे पंचक

युवा अष्टपैलू मुशीर खानच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत विजयाची घोडदौड कायम राखली. मंगळवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात मुंबईने ओदिशाचा २२ धावांनी पराभव केला.
Syed Mushtaq Ali Trophy 2026 : मुशीर खानची अष्टपैलू चमक; मुंबईचे सलग विजयांचे पंचक
Syed Mushtaq Ali Trophy 2026 : मुशीर खानची अष्टपैलू चमक; मुंबईचे सलग विजयांचे पंचकMumbai Cricket Association/Instagram
Published on: 

कोलकाता : युवा अष्टपैलू मुशीर खानच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत विजयाची घोडदौड कायम राखली. मंगळवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात मुंबईने ओदिशाचा २२ धावांनी पराभव केला. या विजयासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मुंबईने सलग पाचवा विजय नोंदवला आणि गट ‘ड’मधील अव्वल स्थान कायम राखले.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना आठ बाद १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ओदिशाला नऊ बाद १५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. फलंदाजीमध्ये १८ चेंडूंत २२ धावा आणि गोलंदाजीमध्ये २७ धावांत दोन विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मुशीर खानला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. नाणेफेक जिंकून ओदिशाने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूंत ४६ धावांची खेळी करत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले. सलामीवीर हार्दिक तामोरेने ३२ धावांचे योगदान दिले, तर तळाच्या फळीतील सैराज पाटीलने नाबाद २६ धावा करत धावसंख्येला आकार दिला. मुंबईने २० षटकांत आठ बाद १८१ धावा केल्या. विमल कुमारने ४२ धावांत तीन विकेट घेतल्या.

१८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओदिशाकडून स्वस्तिक समलने २० चेंडूंत ३८ धावांची आक्रमक खेळी केली. शुभ्रांशू सेनापतीने ३१ धावा केल्या. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेतले. मुशीर खानने २७ धावांत दोन विकेट घेतल्या. अथर्व अंकोलेकरने २४ धावांत दोन, तर शार्दूल ठाकूरने २१ धावांत दोन विकेट मिळवल्या. त्यामुळे ओदिशाचा डाव १५९ धावांवर रोखला गेला.

विदर्भाचा विजयरथ

दुसऱ्या सामन्यात विदर्भाने उत्तराखंडचा १५ धावांनी पराभव करत सलग पाचवा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने आठ बाद २०८ धावा केल्या. रविकुमार समर्थने ३५ चेंडूंत ५९ धावा करत डावाला भक्कम सुरुवात दिली. नचिकेत भुतेने अखेरच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करत २० चेंडूंत ४५ धावा केल्या. २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडकडून आरव महाजनने ३२ चेंडूंत ६९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने सहा चौकार आणि पाच षटकार ठोकले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)