Syed Mushtaq Ali Trophy 2026 : मुंबईची सुपर लीगमध्ये धडक; उत्तराखंडचा धुव्वा उडवून सलग सहाव्या विजयाची नोंद, मुशीर सामनावीर

युवा फलंदाज मुशीर खानचे (४० चेंडूंत ६५ धावा) शानदार अर्धशतक आणि अथर्व अंकोलेकरच्या (१७ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडचा ८६ धावांनी धुव्वा उडवला.
Syed Mushtaq Ali Trophy 2026  : मुंबईची सुपर लीगमध्ये धडक; उत्तराखंडचा धुव्वा उडवून सलग सहाव्या विजयाची नोंद, मुशीर सामनावीर
Syed Mushtaq Ali Trophy 2026 : मुंबईची सुपर लीगमध्ये धडक; उत्तराखंडचा धुव्वा उडवून सलग सहाव्या विजयाची नोंद, मुशीर सामनावीर
Published on: 

कोलकाता : युवा फलंदाज मुशीर खानचे (४० चेंडूंत ६५ धावा) शानदार अर्धशतक आणि अथर्व अंकोलेकरच्या (१७ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडचा ८६ धावांनी धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सलग सहाव्या विजयासह ड-गटात अग्रस्थान कायम राखतानाच थाटात सुपर लीग फेरीत प्रवेश केला.

कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या लढतीत मुंबईने २० षटकांत सर्व बाद २०९ धावांचा डोंगर उभारला. मग उत्तराखंडला १६.५ षटकांत १२३ धावांत गुंडाळून मुंबईने सात सामन्यांत सहावा विजय नोंदवला. मुंबईने साखळी फेरीत अनुक्रमे हैदराबाद, गुजरात, गोवा, छत्तीसगड, ओदिशा व उत्तराखंड यांना पराभूत केले, तर विदर्भाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे मुंबईने ७ सामन्यांत २६ गुण (रद्द लढतीचे २ गुण) कमावले. विदर्भानेदेखील ७ पैकी ६ सामने जिंकून तितकेच २६ गुण मिळवले होते. मात्र सरस धावगतीमुळे (नेटरनरेट) मुंबईने (२.२०८) अग्रस्थान पटकावले, तर विदर्भाला १.०१८ धावगतीसह दुसऱ्या स्थानी रहावे लागले.

आता मुंबईने सुपर लीग फेरीतील स्थान पक्के केले असून त्यांना पुढील फेरीत अन्य तीन संघांशी दोन हात करावे लागतील. या स्पर्धेत साखळी गटात ३२ संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली होती. त्यातून आता प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ सुपर लीगमध्ये दाखल होतील. मग या आठ संघांना दोन गटांत विभागण्यात येईल. सुपर लीगच्या अखेरीस दोन्ही गटांतील आघाडीच्या संघांत अंतिम फेरीचा सामना रंगेल.

आगामी आयपीएलचा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे. त्याच्या अवघ्या दहा दिवस आधी मुश्ताक अली स्पर्धेची सांगता होणार असल्याने आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष या स्पर्धेकडे लागून आहे. नव्या खेळाडूंचा शोध घेण्याबरोबरच संघातील कमकुवत जागा भरून काढण्यासाठी फ्रँचायझींना ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, मुंबईकडून २१ वर्षीय मुशीरने ४० चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह ६५ धावांची शानदार खेळी केली. त्याला सलामीवीर अंक्रिश रघुवंशी आणि हार्दिक तामोरे यांनी दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने अवघ्या २८ चेंडूंत ६६ धावा फटकावल्या. तामोरेने १४ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ३९ धावा केल्या. रघुवंशीने ३४ चेंडूंत ५१ धावा करत अर्धशतक झळकावले.

सर्फराझ खाननेही १५ चेंडूंत ३१ धावांची वेगवान खेळी केली. उत्तराखंडच्या जगदीश सुचितने २८ धावांत तीन बळी घेत मुंबईच्या फलंदाजीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. रविंदर नेगीनेही तीन बळी मिळवले. मात्र, शार्दूल ठाकूरच्या चार चेंडूंतील १० धावांमुळे मुंबईला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला.

२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. कर्णधार कुणाल चंदेला (१२ चेंडूंत १९) आणि आरव महाजन (९ चेंडूंत १५) यांनी काही काळ प्रतिकार केला. मात्र नियमित अंतराने त्यांचे फलंदाज बाद झाले. शाश्वत डांगवालने २० चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह ३७ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यावरील पकड कायम ठेवली. अथर्व अंकोलेकरने १७ धावांत तीन बळी घेतले. मॅक्सवेल स्वामीनाथनने दोन, तर दुबे, पाटील, ठाकूर आणि मुशीर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

मुशीर सलग दुसऱ्यांदा सामनावीर ठरला. ओदिशा संघाविरुद्धही त्याने अष्टपैलू कामगिरीसह हा पुरस्कार जिंकला होता.

संक्षिप्त धावफलक

  • मुंबई : २० षटकांत सर्व बाद २०९ (मुशीर खान ६५, अंक्रिश रघुवंशी ५१; जगदीश सुचित ३/२८) विजयी वि.

  • उत्तराखंड : १६.५ षटकांत सर्व बाद १२३ (शाश्वत डांगवाल ३७; अथर्व अंकोलेकर ३/१७)

विदर्भाचीही आगेकूच

  • ईडन गार्डन्सवर विदर्भाने छत्तीसगडचा ३४ धावांनी पराभव केला. त्यांनी ड-गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत पाच बाद १९४ धावा केल्या. त्यानंतर छत्तीसगडचा डाव १९.१ षटकांत १६० धावांवर संपुष्टात आला.

  • विदर्भाच्या अमन मोखाडेने ४२ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार अथर्व तायडेने २८ चेंडूंत ३७ धावा केल्या, तर दानिश मलेवारने २० चेंडूंत ३७ धावा फटकावल्या. तायडे आणि मलेवार यांनी सलामीला ५७ धावांची भागीदारी केली. मोखाडे बाद झाल्यानंतरही विदर्भाने १९४ धावांपर्यंत मजल मारली.

  • लक्ष्याचा पाठलाग करताना छत्तीसगडच्या संगीता सोनीने १३ चेंडूंत २६ धावा करत चांगली सुरुवात केली. मात्र, विदर्भाच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने बळी मिळवले. प्रफुल्ल हिंगेने ३० धावांत तीन बळी घेतले. यश कदमने ३५ धावांत दोन, तर दर्शन नळकांडेने २६ धावांत दोन बळी मिळवले. अमन मोखाडेनेही एक बळी घेत अष्टपैलू कामगिरीची नोंद केली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)