टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-८ फेरीतील पहिल्या गटात टीम इंडियाची गाठ अफगाणिस्तानशी पडणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केन्सिंग्टन ओव्हल, बार्बोडास येथे होणाऱ्या या लढतीत फिरकीपटूंचे द्वंद्व निर्णायक ठरणार असून साहजिकच तारांकित फलंदाज विराट कोहली पुन्हा लय प्राप्त करणार का, हे पाहणेसुद्धा रंजक ठरेल. दरम्यान आजच्या सामन्यात मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे.
२००७मध्ये टी-२० विश्वचषक उंचावणाऱ्या भारताने यंदा साखळी फेरीत अ-गटात अग्रस्थान काबिज केले. तीन सामन्यांत भारताने अनुक्रमे आयर्लंड, पाकिस्तान व अमेरिकेला नमवले. तर कॅनडाविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. मात्र साखळी फेरीतील भारताचे सर्व सामने अमेरिकेत झाले. आता सुपर-८ फेरीपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये सर्व लढती खेळणार असून पुढील ५ दिवसांत त्यांचे ३ सामने आहेत. त्यामुळे प्रवासाचा थकवा झटकून तंदुरुस्ती टिकवण्याचे आव्हानही भारतीय खेळाडूंपुढे असेल.
दुसरीकडे फिरकीपटू रशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानने क-गटात दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली. युगांडा, पापुआ न्यू गिनी व न्यूझीलंड या संघांना धूळ चारल्यानंतर अखेरच्या साखळी लढतीत अफगाणिस्तानला विंडीजकडून पराभव पत्करावा लागला. मात्र ते अपयश बाजूला सारून हा संघ भारताला धक्का देण्यास आतुर असेल. तसेच अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वचषकात चारही सामने विंडीजमध्येच विविध ठिकाणी खेळले आहेत. त्यामुळे ही बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.