

मुंबई : नुवामा प्रायव्हेट पुरुषांच्या टी-२० मुंबई लीगचे चौथे पर्व आणि टी-२० मुंबई महिला लीगच्या पहिल्या हंगामाला सोमवार, १ जूनपासून सुरुवात होणार आहे.
मुंबई शहर एका भव्य क्रिकेट महोत्सवासाठी सज्ज होत असताना, लीगमधील सहभागी संघांचे कर्णधार सहप्रायोजक ३१ लेबल्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सीझन लाँच कार्यक्रमासाठी एकत्र आले. या कार्यक्रमामुळे अत्यंत रोमांचक व चुरशीच्या क्रिकेट सामन्यांनी भरलेल्या आगामी दोन आठवड्यांच्या पर्वासाठीची पार्श्वभूमी तयार झाली आहे. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमासाठी अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर, सर्फराझ खान असे मुंबईतील नावाजलेले खेळाडू उपस्थित होते. तसेच महिला संघाच्या कर्णधार हुमायरा काझी, सायली सतघरे व साइमा ठाकोरयावेळी हजर होत्या. गतवर्षी सिद्धेश लाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स संघाने जेतेपद मिळवल होते.
या कार्यक्रमाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनी उपस्थिती लावली. एका रोमांचक क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीचा आनंद साजरा करण्यासाठी, एपेक्स कौन्सिल व लीग गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, तसेच सर्व ११ संघांचे सदस्य आणि त्यांचे व्यवस्थापक या वेळी एकत्र आले होते. २०१८मध्ये स्थापन झाल्यापासून टी-२० मुंबई लीग ही क्रिकेट क्षेत्रातील अत्यंत आशादायक गुणवंतांसाठी व्यासपीठ ठरले आहे. त्याशिवाय भारताच्या प्रमुख फ्रँचायझी-आधारित देशांतर्गत टी-२० स्पर्धांपैकी एक म्हणून तिने आपले स्थान भक्कम केले आहे. आगामी हंगामात, पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धांमध्ये, नवोदित गुणवंतांच्या जोडीनेच अनेक जागतिक दर्जाचे खेळाडूही सहभागी होताना दिसतील.
“अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंनी मुंबईकडून खेळल्यानंतर भारताचे प्रतिनिधित्व केले. आता ते युवा खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम सामायिक करून आपले ज्ञान व अनुभव त्यांना देतील, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा दिग्गज खेळाडूंच्या सोबतीने खेळल्यामुळे या युवा खेळाडूंना मिळणारा अनुभव आणि वाव प्रचंड मोलाचा ठरेल,” असे अजिंक्य नाईक म्हणाले.
महिला खेळाडूंसाठीही, प्रस्थापित आणि नामवंत खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम सामायिक करण्याची संधी अत्यंत अमूल्य ठरेल. शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंनी या लीगच्या पहिल्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आणि पुढे जाऊन भारतासाठी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान या स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारवर करण्यात येईल.