

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने भारताचा नवनियुक्त टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुक करत तो या भूमिकेत यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्याने सूर्यकुमार यादवच्या जिद्दीसह भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे.
टी-२० मुंबई लीगमधील सोबो मुंबई फाल्कन्स आणि ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट यांच्यात शनिवारी रात्री झालेल्या सामन्यासाठी रोहित उपस्थित होता. लढतीपूर्वी रोहितने सोबोचा कर्णधार श्रेयस अय्यर, ट्रायम्फचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह छायाचित्रही काढले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात २१,७०८ चाहत्यांच्या उपस्थितीत श्रेयस अय्यरने ३६ चेंडूंत ६१ धावांची मॅचविनिंग खेळी करत फाल्कन्सला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. सूर्यकुमारनेही २४ चेंडूंत ४८ धावा फटकावून चाहत्यांची मने जिंकली. मात्र श्रेयसच्या सोबोने सूर्याच्या नाइट्स संघाने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य १६.४ षटकांतच गाठून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. भारताचा कर्णधार म्हणून नियुक्त झाल्यानंतर श्रेयसने खेळलेला हा पहिलाच सामना होता.
याविषयी रोहितला विचारले असता तो म्हणाला की, “मुंबई क्रिकेटमधील कठीण वातावरण खेळाडूंना सर्वोच्च पातळीवर नेतृत्वासाठी तयार करते. मुंबईत खेळल्याने अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि ज्यांनी भारत किंवा मुंबईचे कर्णधारपद भूषवले आहे ते सर्व जण हेच सांगतील. कारण येथे कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. खेळाडूंना प्रत्येक गोष्ट स्वबळावर मिळवावी लागते आणि कर्णधारपद ही अशीच गोष्ट आहे जी स्वतः कमावून आसपासच्या लोकांचा आदर मिळवावा लागतो.”
भारताचा विश्वविजेता कर्णधार रोहितने मुंबईच्या खेळाडूंच्या प्रवासाचा उल्लेख करताना सूर्यकुमार आणि श्रेयस यांच्या जिद्दीचे उदाहरण दिले. “सूर्यकुमारने टी-२० विश्वचषकात यशस्वी नेतृत्व केले. त्याने वयाच्या ३१व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, याचा अर्थ त्याने कधीही हार मानली नाही. त्याला नेहमी लढत राहायचे होते आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने ती दोन्ही हातांनी पकडली. आता श्रेयसची टी-२० कर्णधार म्हणून घोषणा झाली आहे. गेल्या काही वर्षांत त्याने मुंबई आणि आयपीएलमधील संघासाठी केलेले नेतृत्व पाहता तो या नव्या भूमिकेतही चांगली कामगिरी करेल,” असा विश्वास रोहितने व्यक्त केला.
दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर पुरुषांची आणि महिलांची लीग एकाच वेळी सुरू असून याचे अंतिम सामने १३ जून रोजी होणार आहेत. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जात आहे. पुरुषांच्या विभागात तूर्तास अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नॉर्थ मुंबई पँथर्स तीन विजयांसह गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे.