सुर्यकुमार यादवची तुफान अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचं लक्ष्य

सूर्यकुमार यादवचं झंजावाती अर्धशतक, तसेच शेवटच्या षटकातील अक्षर पटेल यानं केलेल्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध २० षटकांत ८ बाद १८१ धावा केल्या.
सुर्यकुमार यादवची तुफान अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानसमोर १८२ धावांचं लक्ष्य

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानसमोर धावाचं लक्ष्य ठेवलं आहे. बार्बोडास येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर होत असलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवचं झंजावाती अर्धशतक, त्याला मिळालेली हार्दिक पांड्याची साथ, तसेच शेवटच्या षटकातील अक्षर पटेल यानं केलेल्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर भारतानं २० षटकांत ८ बाद १८१ धावा केल्या. अफगाणिस्तानसमोर टीम इंडियानं १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि फारुखी यांनी प्रत्येकी ३ तर नवीन उल-हक याने १ बळी घेतला.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय-

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (१३ चेंडूत ८ धावा) स्वस्तात परतल्यानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतनं आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या ५० च्या जवळ नेऊन ठेवली. परंतु त्यानंतर राशिद खान यानं ऋषभ पंतला तंबूत धाडलं. त्यानं ११ चेंडूत २० धावा केल्या. त्यानंतर थोड्याच अंतरानं विराट कोहलीही वैयक्तिक २४ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी डाव सावरला. मात्र राशिद खानच्या एका चेंडूवर शिवम दुबे (७ चेंडूत १० धावा) फसला आणि चेंडू त्याच्या पॅडवर आदळला.

सुर्यकुमार यादवनं चौफेर फटकेबाजी-

दुबे बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यानं डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. सुर्यकुमार यादवनं चौफेर फटकेबाजी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पिसे काढली. सुर्यकुमार यादवनं २७ चेंडूत षटकार मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर पुढच्याच चेंडूत फारूखीला फटका मारताना तो झेलबाद झाला. त्यानं ५३ धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याही (२४ चेंडूत ३२ धावा) करून बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजानं निराशा केली. शेवटच्या टप्प्यात अक्षर पटेलनं ६ चेंडूत १२ धावा बनवून भारताची धावसंख्या २० षटकांत ७ बाद पर्यंत पोहोचवली.

राशिद खानची दमदार गोलंदाजी-

अफगाणिस्तानकडून राशिद खाननं २६ धावा देत ३ तर फारुखीनं ३३ धावा देत ३ बळी घेतले. तर नवीन उल-हक यानं एक बळी घेतला.

logo
marathi.freepressjournal.in