ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
"अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है..." ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर शनिवार, २९ जून रोजी भारतीय संघाचे ११ शिलेदार जेव्हा मैदानात उतरतील, तेव्हा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचे एकमेव लक्ष्यच त्यांच्यासमोर असेल. गेल्या वर्षी राहिलेली अधुरी कहाणी यंदा पूर्ण करून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ १७ वर्षांनी टी-२० विश्वचषक उंचावण्यात यशस्वी व्हावा, अशीच प्रार्थना तमाम देशवासी करत आहेत. बार्बोडोसच्या रणांगणात शनिवारी भारताची टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत झुंजार वृत्तीच्या दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडणार आहे. त्यामुळे स्पर्धेत अपराजित असलेल्या या दोन संघांमधील द्वंद्वात कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागून आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७मध्ये अखेरचा टी-२० विश्वचषक जिंकला. त्याच्याच कर्णधारपदात मग भारताने २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषक, तर २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवरही नाव कोरले. मात्र तेव्हापासून भारताने आयसीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकही स्पर्धा जिंकलेली नाही. द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये भारताने नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. मात्र गेल्या ११ वर्षांपासून त्यांना आयसीसी जेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. २०१४चा टी-२० विश्वचषक, २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२१ व २०२३ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, २०२३चा एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या स्पर्धांमध्ये भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. तर काही स्पर्धांमध्ये भारताला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यातही गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मायदेशात अंतिम फेरीपर्यंत अपराजित राहूनही अखेरच्या क्षणी पत्करावा लागलेला पराभव भारतीय खेळाडूंसह देशातील सर्व क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागला. त्यातून आता सावरत ७ महिन्यांच्या कालावधीत किमान टी-२० विश्वचषकाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाला आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणार असून उपांत्य लढतीत त्यांनी इंग्लंडला धूळ चारली.
दुसरीकडे एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणारा आफ्रिका संघसुद्धा या स्पर्धेत अपराजित आहे. त्यांनी तर १९९८मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्वरूपात एकमेव आयसीसी स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. त्यांनी यंदा प्रथमच टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली असून उपांत्य लढतीत आफ्रिकेने अफगाणिस्तानला सहज नामोहरम केले. आपल्यावरील चोकर्सचा शिक्का पुसून काढत यंदा या संघाने लक्षवेधी झेप घेतली असून त्यांच्याविरुद्ध भारताचे शिलेदार कशी कामगिरी करतात, याकडेच दर्दी क्रीडारसिकांचे लक्ष लागून आहे.
पाऊस आला तर काय?
-अंतिम लढतीच्या दिवशी सकाळी ४ ते ९च्या दरम्यान ५० टक्के पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. दुपारी १च्या सुमारास पावसाची आणखी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान १० षटके फलंदाजी करणे गरजेचे आहे. पहिल्या दिवशी सामना शक्य न झाल्यास रविवारचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. जर शनिवारी खेळ सुरू झाला असेल, तर रविवारी तो तेथूनच पुढे चालू करण्यात येईल. रविवारीसुद्धा रिमझिम पावसाची शक्यता आहे.
-राखीव दिवशीसुद्धा खेळ शक्य न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात येईल.
खेळपट्टी काय सांगते?
-ब्रिजटाऊन येथे यंदाच्या विश्वचषकात ९ सामने झाले असून त्यापैकी चार सामने तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू झाले आहेत.
-अंतिम फेरीसुद्धा सकाळीच होणार असून यापूर्वीच्या १०.३० वाजता सुरू झालेल्या चार सामन्यांमध्ये तीन वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.
-भारताने येथे अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी सरशी साधली. आफ्रिकेचा संघ या मैदानावर यंदाच्या विश्वचषकात एकही लढत खेळलेला नाही. फिरकीपटू तसेच वेगवान गोलंदाजांना येथे पुरेसे सहाय्य मिळेल.
रोहित, सूर्यकुमार लयीत; विराटकडून अपेक्षा
गेल्या दोन सामन्यांत दमदार अर्धशतके झळकावणारा कर्णधार रोहित आणि मुंबईकर सूर्यकुमार यादव यांच्यावर भारताची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे. विशेषत: रोहितची पॉवरप्लेमधील बेधडक वृत्ती संघासाठी लाभदायी ठरत आहे. विराट कोहलीला मात्र या स्पर्धेत ७ सामन्यांत फक्त ७५ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत त्याची बॅट तळपावी, अशीच चाहत्यांची इच्छा आहे. त्याशिवाय ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शिवम दुबे व अक्षर पटेल गरजेनुसार फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. रवींद्र जडेजानेसुद्धा इंग्लंडविरुद्ध निर्णायक क्षणी धावा करून लय मिळवली आहे. गेल्या ४ लढतींमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली असल्याने अंतिम फेरीत धावांचा पाठलाग करायचा झाल्यास, भारताचे फलंदाज कशी कामगिरी करतात यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.
बुमराचा धसका, फिरकीचा धोका
भारतासाठी या विश्वचषकात डावखुऱ्या अर्शदीप सिंगने सर्वाधिक १५ बळी मिळवले असले तरी प्रतिस्पर्धी संघाने सर्वात जास्त धसका घेतला असेल तो म्हणजे जसप्रीत बुमराचा. या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या अव्वल पाच गोलंदाजांमध्ये अर्शदीप व बुमरा अनुक्रमे दुसऱ्या व पाचव्या स्थानी आहेत. वेगवान बुमराने १३ बळी मिळवताना धावा देतानाही कंजुशी केलेली आहे. त्यातच भर म्हणजे कुलदीप यादव, अक्षर व जडेजा यांचे फिरकी त्रिकुट आफ्रिकन फलंदाजांना नाकीनऊ आणू शकतात. इंग्लंडविरुद्ध भारतीय फिरकीपटूंची जादू सर्वांनी पाहिली.
डीकॉक, क्लासेन, मिलरला रोखण्याचे आव्हान
अनुभवी सलामीवीर क्विंटन डीकॉकने आफ्रिकेसाठी या विश्वचषकात सर्वाधिक २०४ धावा केल्या आहेत. त्याशिवाय हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स व मार्करम असे फलंदाज त्यांच्या मधल्या फळीत असल्याने भारतीय गोलंदाजांचाही कस लागेल. आफ्रिकेच्या फलंदाजांना फिरकीला पोषक खेळपट्टीवर काहीसा संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे ते भारतीय फिरकीपटूंविरुद्ध कसे खेळतात, हे पाहणे रंजक ठरेल. कर्णधार मार्करमने स्पर्धेत एकही अर्धशतक झळकावलेले नसून रीझा हेंड्रिक्सलाही संघर्ष करावा लागला आहे.
वेगवान त्रिकुट आणि शम्सीवर मदार
आफ्रिकेसाठी वेगवान गोलंदाज आनरिख नॉर्किएने या स्पर्धेत सर्वाधिक १३ बळी घेतले आहेत. त्याशिवाय कॅगिसो रबाडा, मार्को यान्सेन या वेगवान जोडीची त्याला उत्तम साथ लाभत आहे. डावखुरा फिरकीपटू तबरेझ शम्सी व केशव महाराज मधल्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करत आहे. भारतीय फलंदाजांविरुद्ध आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांची जुगलबंदी पाहण्यात मजा येईल. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी या विश्वचषकात फलंदाजांच्या तुलनेत अधिक चमकदार कामगिरी केली आहे.
१४ - ११
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या २६ टी-२० सामन्यांत भारताने १४, तर आफ्रिकेने ११ लढती जिंकल्या आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. टी-२० विश्वचषकात उभय संघांतील ६ सामन्यांपैकी भारताने ४, तर आफ्रिकेने २ सामन्यांत बाजी मारली आहे.
- भारत-आफ्रिका प्रथमच एखाद्या आयसीसी स्पर्धेच्या (एकदिवसीय अथवा टी-२०) अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत.
- भारत आणि आफ्रिका दोन्हीही संघ या स्पर्धेत अपराजित असून टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एखादा संघ अपराजित राहून जेतेपद मिळवणार आहे.
- भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली असून यापूर्वी २००७मध्ये त्यांनी जेतेपद, तर २०१४मध्ये उपविजेतेपद मिळवले. आफ्रिकेने मात्र प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास
साखळी फेरी
-वि. श्रीलंका (६ गडी राखून विजयी)
-वि. नेदरलँड्स (४ गडी राखून विजयी)
-विवि. बांगलादेश (४ धावांनी विजयी)
-वि. नेपाळ (१ धावेने विजयी)
सुपर-८ फेरी
-वि. अमेरिका (१८ धावांनी विजयी)
-वि. इंग्लंड (७ धावांनी विजयी)
-वि. वेस्ट इंडिज (३ गडी राखून विजयी)
उपांत्य फेरी
-वि. अफगाणिस्तान (९ गडी राखून विजयी)
सर्वाधिक धावा
-क्विंटन डीकॉक(२०४ धावा, २ अर्धशतके)
सर्वाधिक बळी
-आनरिख नॉर्किए (८ सामन्यांत १३ बळी)