T20 World Cup 2024: भारताची आज बांगलादेशशी गाठ; एकाच गोष्टीची टीम इंडियाला चिंता!

कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे यशस्वीपणे पेलत भारतीय संघ सध्या तरी यंदाच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे यशस्वीपणे पेलत भारतीय संघ सध्या तरी यंदाच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. शनिवारी भारतीय संघाची सुपर-८ फेरीतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशशी गाठ पडेल.

एकाच गोष्टीची चिंता

या लढतीत भारतीय संघाला एकाच गोष्टीची अधिक चिंता असेल ती म्हणजे सलामीवीरांची कामगिरी. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि तारांकित विराट कोहली या सलामीवीरांना आता सूर गवसणार का, हे पाहणे रंजक ठरेल. रोहित व विराट यांनी गेल्या काही सामन्यांत सातत्याने निराशा केली आहे. विराटने साखळी फेरीतील ३ व सुपर-८मधील १ अशा एकूण ४ लढतींमध्ये अनुक्रमे १, ४, ०, २४ अशा फक्त २९ धावा केल्या आहेत. तसेच तर रोहितने ४ सामन्यांत अनुक्रमे नाबाद ५२, १३, ३, ८ अशा एकूण ७६ धावा केल्या आहेत. या दोघांना अद्याप एकही अर्धशतकी भागीदारी नोंदवता आलेली नाही, हेसुद्धा विशेष. त्यामुळे ऑस्ट्रेलियाशी २४ तारखेला होणाऱ्या लढतीपूर्वी या दोघांनी लय मिळवणे महत्त्वाचे आहे.

उपांत्य फेरीचे लक्ष्य

रोहितच्या शिलेदारांनी गुरुवारी सुपर-८ फेरीच्या पहिल्या लढतीत अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. भारताने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे १८१ धावांपर्यंत मजल मारल्यावर जसप्रीत बुमरा व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवून अफगाणिस्तानला १३४ धावांतच गुंडाळले. त्यामुळे आता शनिवारी बांगलादेशला नमवून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का करण्याचे भारताचे लक्ष्य असेल. दुसरीकडे बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आव्हान टिकवून ठेवण्यासाठी बांगलादेशला ही लढत जिंकणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांचे प्रथमच उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न उद्ध्वस्त होईल.

सूर्यकुमार, बुमरा लयीत; शिवमवर दडपण

मुंबईकर सूर्यकुमारने गेल्या दोन लढतींमध्ये अर्धशतक झळकावून स्वत:चे महत्त्व सिद्ध केले. मात्र मुंबईच्याच शिवम दुबेला अद्याप छाप पाडता आलेली नाही. अमेरिकेविरुद्ध केलेल्या ३१ धावा वगळता शिवमने निराशा केलेली आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वाल किंवा संजू सॅमसनला खेळवण्याचा पर्याय संघ व्यवस्थापनापुढे आहे. विराट पुन्हा तिसऱ्या स्थानी फलंदाजीस आला, तर यशस्वी सलामीला येईल व नाइलाजास्तव शिवमलाच संघातील स्थान गमवावे लागेल. यष्टिरक्षक ऋषभ पंत व हार्दिक पंड्या फलंदाजीत पुरेसे योगदान देत आहेत. मात्र त्यांच्याकडूनही मोठी खेळी साकारली जावी, अशी चाहते अपेक्षा ठेवून आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा भारताचे मुख्य अस्त्र असून त्याला अर्शदीप सिंगची प्रभावी साथ लाभत आहे. बुमराने ४ सामन्यांत भारताकडून सर्वाधिक ८ बळी घेतले आहेत. या लढतीतही भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कुलदीप यादव, अक्षर पटेल व रवींद्र जडेजा या फिरकीपटूंपासून बांगलादेशला सावध रहावे लागेल. मोहम्मद सिराज पुन्हा संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

-केन्सिंग्टन येथे आतापर्यंत या विश्वचषकातील चारपैकी ३ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सामना सुरू होणार असून त्यावेळी तापमान ३० ते ३५ डिग्रीच्या दरम्यान असेल. सुपर-८ फेरीत आफ्रिकेने येथे सकाळच्या लढतीत अमेरिकेविरुद्ध १९४ धावा केल्या.

-येथेच झालेल्या बांगलादेश-ऑस्ट्रेलिया लढतीत पावसाने खोळंबा केला. मात्र शनिवारी पावसाची फक्त १५ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस आला तरी, सामना पूर्णपणे रद्द होणार नाही, इतके निश्चित.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १३ टी-२० सामन्यांपैकी भारताने तब्बल १२, तर बांगलादेशने फक्त १ लढत जिंकली आहे. तसेच टी-२० विश्वचषकाचा इतिहास पाहता भारताने बांगला टायगर्सला चारही वेळा नमवले आहे. त्यावरूनच भारताचे त्यांच्याविरुद्धचे वर्चस्व अधोरेखित होते.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

बांगलादेश : नजमूल होसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्य सरकार, तांझिद हसन, शाकिब अल हसन, तौहिद हृदय, महमदुल्ला रियाद, रिशाद होसैन, मुस्तफिझूर रहमान, शोरीफुल इस्लाम, तांझिम हसन, जेकर अली, तन्विर इस्लाम, मेहदी हसन.

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि हॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in