लॉडरहील : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ शनिवारी यंदाच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. फ्लोरिडा येथे भारत-कॅनडा यांच्यात लढत होणार असून या सामन्यावर पावसाचे दाट सावट निर्माण झाले आहे. मात्र भारतीय संघाला मुख्य चिंता सतावत असेल ती विराट कोहलीच्या कामगिरीची. सुपर-८ फेरीपूर्वी या तारांकित फलंदाजाने त्याची लय मिळवणे महत्त्वाचे आहे.
२००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारताने यंदा सलामीच्या लढतीत आयर्लंडला धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध चित्तथरारक लढतीत ६ धावांनी सरशी साधून त्यांनी सलग दुसरा विजय नोंदवला. तिसऱ्या सामन्यात भारताने युवा खेळाडूंच्या कामगिरीमुळे अमेरिकेला नमवून सुपर-८ फेरी गाठली. त्यामुळे भारतीय संघ सध्या अ-गटात ६ गुणांसह अग्रस्थानी आहे. आता चौथ्या सामन्यात विराटची बॅट तळपल्यास भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी वाढेल. विराटने यंदाच्या विश्वचषकात सलामीला येताना तीन सामन्यांत १, ४, ० अशा फक्त ५ धावा केल्या आहेत. विराटला पुन्हा एकदा सलामीला संधी देणार की त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणार, हेसुद्धा पाहणे रंजक ठरेल. त्याशिवाय प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचाही पर्याय संघ व्यवस्थापनापुढे उपलब्ध आहे.
दुसरीकडे कॅनडाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ३ सामन्यांतील २ गुणांसह कॅनडाचा संघ गटात चौथ्या स्थानी आहे. मात्र भारताला नमवूनही त्यांची आगेकूच करणे कठीण आहे. कॅनडाने आयर्लंडला या स्पर्धेत एकमेव धक्का देत चाहत्यांचे लक्ष वेधले. साद बिन जाफरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाची भिस्त निकोलस किर्टन, आरोन जॉन्सन, कलीम सना यांच्यावर आहे. फ्लोरिडा येथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ही लढतही रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यशस्वी सलामीला, विराट तिसऱ्या स्थानी?
यंदाच्या टी-२० विश्वचषकापूर्वी यशस्वी जैस्वाल व रोहित ही मुंबईकर जोडीच भारतासाठी सलामीला उतरत होती. मात्र आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर विराटला सलामीला पाठवण्यात आले. आतापर्यंत तरी हा प्रयोग फसलेला आहे. मात्र अखेरच्या साखळी लढतीत यशस्वीला संधी देऊन विराट पुन्हा तिसऱ्या स्थानी येणार का, याकडे चाहते लक्ष ठेवून असतील. मधळ्या फळीत सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांनी अमेरिकाविरुद्ध छाप पाडली. त्यामुळे त्यांना वगळण्यात येण्याची शक्यताही कमी आहे. अशा स्थितीत यशस्वीसाठी अक्षर पटेल किंवा रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाला संघाबाहेर करावे लागू शकते. कर्णधार रोहितकडूनही मोठी खेळी अपेक्षित आहे.
गिल, आवेश मायदेशी परतणार
भारताचा सलामीवीर शुभमन गिल व वेगवान गोलंदाज आवेश खान कॅनडाविरुद्धच्या साखळी लढतीनंतर मायदेशी परतणार आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. गिल व आवेश या दोघांनाही टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आले होते. मात्र आता सुपर-८ फेरीचा विचार करता संघ व्यवस्थापनाने फक्त डावखुरा फलंदाज रिंकू सिंग व डावखुरा वेगवान गोलंदाज खलिल अहमद या राखीव खेळाडूंनाच वेस्ट इंडिजमध्येही संघासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गिल व आवेश यांना आधीच यासंबंधी कल्पना दिली होती, असे समजते. त्यामुळे आता गिल व आवेश भारतात परततील. साखळी फेरीत भारताचे ३ सामने न्यूयॉर्क, तर १ लढत फ्लोरिडा येथे आयोजित होती. सुपर-८ फेरीपासून भारतीय संघ सर्व सामने वेस्ट इंडिजमधील विविध ठिकाणी खेळणार आहे.