T20 World Cup : भारताचे अभियान आजपासून सुरू! आयर्लंडशी सलामीची लढत; विराटच्या फलंदाजी क्रमाकडे लक्ष, यशस्वी संधीच्या प्रतीक्षेत

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ज्वर बुधवारी प्रामुख्याने वाढेल, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
T20 World Cup : भारताचे अभियान आजपासून सुरू! आयर्लंडशी सलामीची लढत; विराटच्या फलंदाजी क्रमाकडे लक्ष, यशस्वी संधीच्या प्रतीक्षेत

न्यूयॉर्क : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ज्वर बुधवारी प्रामुख्याने वाढेल, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारताचा संघ बुधवारी टी-२० विश्वचषकाच्या अभियानाला प्रारंभ करणार असून त्यांची अ-गटातील साखळी लढतीत आयर्लंडशी गाठ पडणार आहे. या सामन्यात विराट कोहली कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार, याकडेच चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

२००७मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या शिलेदारांनी भारताला पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले. रोहितही त्या संघाचा भाग होता. त्यानंतर जवळपास १७ वर्षे उलटली तरी भारतीय संघाचा दुसऱ्या टी-२० विश्वचषकाचा शोध सुरू आहे. तसेच २०१३मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकलेली आहे. गेल्या ११ वर्षांचा हा दुष्काळ यंदा रोहितचे शिलेदार संपुष्टात आणणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने ६० धावांनी विजय मिळवला. या लढतीत यशस्वी जैस्वालला संधी देण्यात आली नाही. रोहित आणि संजू सॅमसन यांनी त्या लढतीत सलामीला फलंदाजी केली. त्यामुळे आता विराट परतल्यावर रोहितच्या साथीने तोच सलामीला येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. विराटने यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूकडून सलामीला येताना १५ सामन्यांत १ शतक व ५ अर्धशतकांसह सर्वाधिक ७४१ धावा केल्या. त्यामुळे रोहित-विराट सलामीला आल्यास भारतीय फलंदाजांचा क्रम कसा असेल, याकडेही चाहते लक्ष ठेवून असतील.

दरम्यान, दुसरीकडे पॉल स्टर्लिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आयर्लंडला भारतीय संघ कमी लेखू शकत नाही. जोश लिटल, हॅरी टॅक्टर, अँडी बर्ल्बिर्नी यांच्यावर आयर्लंडची भिस्त आहे. येथील खेळपट्टीवर चेंडू काहीसा कमी उसळत असून फिरकीपटूंना चांगले सहाय्य मिळू शकते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना १७० ते १८० धावा केल्यासही विजयासाठी पुरेशा ठरू शकतात. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल या लढतीत मोलाची भूमिका बजावू शकतो.

रोहित-हार्दिकवर नजरा; बुमरावर मदार

भारताचा ३७ वर्षीय कर्णधार रोहितचा हा कारकीर्दीतील अखेरचा टी-२० विश्वचषक असू शकतो. त्यामुळे तो या स्पर्धेत कशाप्रकारे आक्रमक सुरुवात करून देणार, यावर भारताचे बरेचसे यश अवलंबून असेल. त्याशिवाय उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडेही चाहत्यांचे लक्ष असेल. हार्दिक आयपीएलमधील अपयश तसेच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी बाजूला सारून संघासाठी अष्टपैलू योगदान देण्यास आतुर असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा हा आघाडीचा वेगवान गोलंदाज भारतासाठी हुकमी एक्का ठरणार असून त्याला कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंची साथ लाभणे आवश्यक आहे. भारतीय संघ तिसऱ्या फिरकीपटूच्या रूपात युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी देऊ शकते.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडेर, रॉस अडेर, अँडी बल्बिर्नी, कुर्टीस कॅम्फर, गेराथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम हुम, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, निल रॉक, हॅरी टॅक्टर, लोर्कान टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.

logo
marathi.freepressjournal.in