न्यूयॉर्क : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ बुधवारी भारतीय खेळाडूंचाच प्रामुख्याने समावेश असलेल्या अमेरिकेशी दोन हात करणार आहे. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूयॉर्क येथील नासाऊ कौंटी क्रिकेट स्टेडियमवर अ-गटातील साखळी लढतीत उभय संघ आमनेसामने येतील. हा सामना जिंकणारा संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत.
२००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारताने यंदा सलामीच्या लढतीत आयर्लंडला धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध चित्तथरारक लढतीत ६ धावांनी सरशी साधून त्यांनी सलग दुसरा विजय नोंदवला. भारतीय संघ सध्या अ-गटात ४ गुणांसह तसेच अमेरिकेच्या तुलनेत सरस धावगतीमुळे अग्रस्थानावर आहे. आता सुपर-८ फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी भारताला उर्वरित दोनपैकी किमान एक लढत जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे रोहितचे शिलेदार बुधवारीच आगेकूच करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही.
‘इंडिया विरुद्ध मिनी इंडिया’
दुसरीकडे भारतातच जन्मलेल्या मोनांक पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अमेरिकाने पहिल्याच टी-२० विश्वचषकात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या १५ जणांच्या संघात ८ भारतीय, २ पाकिस्तानी, तर वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आफ्रिका व नेदरलँड्सचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. त्यामुळे भारत-अमेरिकेतील लढतीकडे ‘इंडिया विरुद्ध मिनी इंडिया’ असे पाहिले जात आहे. अमेरिकेने सलामीच्या लढतीत कॅनडाला नेस्तनाबूत केल्यावर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर सुपर-ओव्हरमध्ये सरशी साधली. त्यामुळे ते भारतासह या गटातून बाद फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
सूर्यकुमार, शिवमला आणखी एक संधी?
फलंदाजीचा विचार करता रोहित व विराट कोहली या सलामीवीरांकडून भारताला दमदार सुरुवात अपेक्षित आहे. विशेषत: विराटने दोन्ही सामन्यांत अनुक्रमे १ व ४ धावाच केल्या आहेत. त्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानी खेळवून संघ व्यवस्थापन यशस्वी जैस्वालला संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांना मात्र आता कामगिरी उंचावण्याची नितांत गरज आहे. अन्यथा संजू सॅमसनला खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ऋषभ पंत फलंदाजी तसेच यष्टिरक्षणातही छाप पाडत आहे. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ ११९ धावांत गारद झाला, त्यातही उर्वरित ७ विकेट्स अवघ्या ३० धावांत गेल्या. त्यामुळे फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.
दुपारी पावसाचा अंदाज
न्यूयॉर्कची खेळपट्टी यंदा गोलंदाजांसाठी पोषक असल्याने येथे धावांचा पाठलाग करणे कठीण जात आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १२० ते १३० धावा केल्या, तरी सामना रंगतदार होऊ शकतो. न्यूयॉर्कमधील वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ८) ही लढत सुरू होणार असून तेथे दुपारी १२च्या सुमारास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा काही वेळेसाठी हिरमोड होऊ शकतो.
सांघिक कामगिरी अमेरिकेची ताकद
मोनांक, आरोन जोन्स, कोरी अँडरसन असे दमदार फलंदाज तसेच सौरभ नेत्रावलकर, हरमीत सिंग असे प्रतिभावान वेगवान गोलंदाज यांच्यामुळे अमेरिकेने आतापर्यंत चमकदार खेळ केला आहे. तसेच घरच्या मैदानात खेळताना त्यांना चाहत्यांचा पाठिंबाही लाभत आहे. अमेरिकेने भारत अथवा आयर्लंड यांच्यापैकी एकाला जरी नमवले, तरी त्यांचा सुपर-८ फेरीतील प्रवेश पक्का होईल. तसेच अमेरिकेला कमी लेखणे भारताला महागात पडू शकते.
बुमरावर पुन्हा नजरा
पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला जसप्रीत बुमरा सध्या भन्नाट लयीत असून पुन्हा एकदा त्याच्यावर भारतीय गोलंदाजीची भिस्त असेल. बुमराने २ सामन्यांत ५ बळी मिळवले असून भारताच्या दोन्ही सामन्यांत त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंगही प्रभावी मारा करत आहे. अक्षर पटेल किंवा रवींद्र जडेजापैकी एकाला विश्रांती देऊन कुलदीप यादव अथवा युझवेंद्र चहलला संधी देता येऊ शकते.