न्यूयॉर्क : वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयी सलामी नोंदवली. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंग यांनी आयर्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यामुळे भारताने त्यांचा डाव ९६ धावांवर आटोपला. त्यानंतर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान १२.२ षटकांत ८ विकेट्स शिल्लक राखून पार केले.
आयर्लंडचे ९७ धावांचे लक्ष्य पार करताना भारताला तिसऱ्याच षटकांत पहिला धक्का बसला. मार्क अडैर याने विराट कोहलीला (१) व्हाईटकरवी झेलबाद केले. मात्र त्यानंतर रोहित शर्माने सुरेख फटकेबाजी करत आपले अर्धशतक साजरे केले. त्याला ऋषभ पंतची चांगली साथ लाभली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावा जोडल्या. त्यामुळे भारताने हे आव्हान सहज पार केले. रोहित शर्माच्या डोक्याला मार बसल्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतावे लागले. मात्र त्याने ३७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा फटकावल्या. पंतने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, मध्यमगती गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारताने या सामन्यात आयर्लंडला अवघ्या ९६ धावांवर रोखले होते. हार्दिक पंड्याने तीन तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत आयर्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
आयर्लंडचा संघ ८ बाद ५० अशा बिकट अवस्थेत सापडला असताना गॅरेथ डेलने याने केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला शतकी धावांच्या आसपास मजल मारता आली. डेलने याने आयर्लंडकडून सर्वाधिक २६ धावा फटकावल्या.
न्यूयॉर्कच्या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार असल्याचा अंदाज असल्यामुळेच भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आयर्लंडचा अनुभवी सलामीवीर पॉल स्टर्लिंग (२) याला बाद करत हा विश्वास सार्थ ठरवला. याच षटकांत त्याने दुसरा सलामीवीर अँडी बालबिर्नी याचाही त्रिफळा उडवला. सातव्या षटकांत पंड्याने लोरकान टकर (१०) याला त्रिफळाचीत केल्यानंतर बुमराने हॅरी टेक्टर (४) (४) याचा अडसर दूर केला. पंड्याने नवव्या षटकाच्या अखेरीस कर्टिस कॅम्फर (१२) याला माघारी पाठवत आयर्लंडला ५ बाद ४४ अशा स्थितीत आणले. आयर्लंडने त्यानंतर जॉर्ज डॉकरेल (३), मार्क अडैर (३) आणि बॅरी मॅककार्थी (०) यांचे विकेट्स गमावले. त्यामुळे आयर्लंडचा संघ ८ बाद ५० अशा अडचणीत सापडला होता. त्यानंतर गॅरेथ डेलने याने जोश लिटिलसह (१४) २७ धावांची भर घातली. डेलने याने २ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावा फटकावल्या.