डल्लास : गेल्या वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या पाकिस्तानला यंदा सलामीच्या सामन्यातच यजमान अमेरिकेशी दोन हात करावे लागणार आहेत. अमेरिका संघाने सलामीच्या लढतीत कॅनडावर मात केली होती. या विजयामुळे यजमानांचा खेळाडूंचा आत्मविश्वास काहीसा दुणावला असला तरी टी-२०मध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
पाकिस्तानच्या संघाला अलीकडच्या काळात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध एक ट्वेन्टी-२० सामना गमावल्यानंतर पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत पाकिस्तानला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. या मालिकेत न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी विश्रांती घेणे पत्करले होते. प्रमुख खेळाडू नसतानाही पाकिस्तानला फारशी चमक दाखवता आली नाही.
पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझमऐवजी शाहीन आफ्रिदीकडे सोपवण्यात आले होते. मात्र काही सामन्यांनंतरच शाहीनला हटवून पुन्हा बाबरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. शाहीनला विश्वचषकासाठी उपकर्णधारपद भूषवण्याबाबत विचारणा करण्यात आली. परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. आता या सगळ्या गोष्टी बाजूला सारून मैदानावर दमदार कामगिरी करण्यावर पाकिस्तानच्या संघाला लक्ष केंद्रित करावे लागेल.
- सामन्याची वेळ : रात्री ९ वाजल्यापासून