फ्लोरिडात पूरसदृश परिस्थिती: तीन सामने पावसामुळे वाया जाणार, पाकला गाशा गुंडाळावा लागणार?

पुढील तीन दिवस फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
फ्लोरिडात पूरसदृश परिस्थिती: तीन सामने पावसामुळे वाया जाणार, पाकला गाशा गुंडाळावा लागणार?

मायामी : पुढील तीन दिवस फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ११ जून रोजी फ्लोरिडातील लॉडरहिल येथे होणारा श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता अमेरिका वि. आयर्लंड (१४ जून), भारत वि. कॅनडा (१५ जून) आणि पाकिस्तान वि. आयर्लंड (१६ जून) हे तीन सामनेही मुसळधार पावसामुळे रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुपर-८ फेरीचे गणित नक्कीच बिघडणार आहे.

मायामी आणि फ्लोरिडामध्ये पूरसदृश आणीबाणी लागू करण्यात आल्याचा दावा अनेक वृत्तसंस्थांनी केला आहे. अ गटातील काही सामने आता फ्लोरिडातील लॉडरहिल येथे होणार आहेत. फ्लोरिडापासून लॉडरहिल हे ३० मैल अंतरावर आहे. १४ जून रोजी होणारा अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात १०० टक्के मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करावा लागणार आहे. १५ जून रोजी भारत आणि कॅनडा यांच्यात होणाऱ्या सामन्यादरम्यानही मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट होण्याची ८६ टक्के शक्यता आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचीही निराशा होणार आहे. भारताने याआधीच सुपर-८ फेरीतील प्रवेश निश्चित केल्यामुळे हा सामना पावसामुळे वाया गेला तरी टीम इंडियाला कोणताही फरक पडणार नाही. कॅनडा सुपर-८ फेरीच्या शर्यतीतून बाद झाल्यामुळे त्यांच्या खात्यात मात्र एक गुण जमा होईल.

१६ जून रोजी पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात होणारा सामना पाकिस्तानसाठी सुपर-८ फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. मात्र या सामन्यातही ८० टक्के मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकन हवामान विभागाचा अंदाज हा अचूक असल्यामुळे हे तिन्ही सामने पावसामुळे रद्द करावे लागणार आहेत. त्यामुळे पावसाचा सर्वात जास्त मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे.

पुढचे समीकरण असे असेल...

समजा तिन्ही सामने पावसामुळे वाया गेले तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला सुपर-८ फेरीआधीच गाशा गुंडाळावा लागेल. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. अमेरिकेचे ५ गुण होऊन ते सुपर-८ फेरी गाठतील. पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तरी ते स्पर्धेबाहेर जातील. त्यामुळे पाकिस्तानला सुपर-८ फेरी गाठायची असेल तर आयर्लंडने आधी अमेरिकेला हरवायला हवे आणि नंतर पाकिस्तानने आयर्लंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवायला हवा.

श्रीलंकन संघ फोर्ट लॉडरडेलमध्ये अडकला

फ्लोरिडामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका श्रीलंका क्रिकेट संघाला बसला असून ते फोर्ट लॉडरडेलमध्ये अडकले आहेत. त्यांचा पुढील सामना कॅरेबियन बेटांवरील सेंट ल्युसिया येथे होणार असून त्यांचे प्रस्तावित विमान रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सेंट ल्युसियामध्ये पोहोचण्यास विलंब होणार आहे. श्रीलंकेचा पुढील सामना १७ जून रोजी नेदरलँड्सशी होणार असून ते आता शुक्रवारी कॅरेबियन बेटांवर प्रयाण करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in