T20 World Cup 2024 : उद्यापासून सुपर-८ चा थरार; भारताचे कधी आणि कोणाशी सामने? बघा संपूर्ण वेळापत्रक

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आता आणखी वाढणार आहे. बांगलादेशच्या नेपाळवरील विजयामुळे आता पुढील चित्र स्पष्ट झाले असून बुधवार, १९ जूनपासून विश्वचषकातील सुपर-८ फेरीला प्रारंभ होणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

अँटिग्वा : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आता आणखी वाढणार आहे. बांगलादेशच्या नेपाळवरील विजयामुळे आता पुढील चित्र स्पष्ट झाले असून बुधवार, १९ जूनपासून विश्वचषकातील सुपर-८ फेरीला प्रारंभ होणार आहे. यामध्ये अव्वल ८ संघांमधील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा सुपर-८ फेरीसाठी पहिल्या गटात समावेश करण्यात आला असून त्यांना अनुक्रमे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांशी दोन हात करायचे आहेत. दुसऱ्या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका या संघांचा समावेश असेल.

२ जूनपासून सुरू झालेल्या यंदाच्या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. विशेषत: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लढतींमध्ये अनेकदा ११० ते १२० धावांचा यशस्वी बचाव करण्यात आला. तर फ्लोरिडा येथे मात्र पावसाने काही सामन्यांवर पाणी फेरले. मात्र सुपर-८ फेरीपासून विश्वचषकातील सर्व लढती पूर्णपणे वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येणार आहेत. येथेही काही सामन्यांत पावसाची बॅटिंग पाहायला मिळू शकते.

आयसीसीने स्पर्धेपूर्वीच क्रमवारीनुसार काही संघांना सीडिंग दिले होते. त्यामुळे भारत (ए१), ऑस्ट्रेलिया (बी२) यांनी आपापल्या गटात अग्रस्थान मिळवूनही सुपर-८ फेरीत ते एकाच गटात आहेत. सुपर-८ फेरीत प्रत्येक संघाला ३ सामने खेळायचे आहेत. गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. साखळी सामन्यातील गुण अथवा धावगती सुपर-८ फेरीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. २५ जूनपर्यंत सुपर-८ फेरी रंगणार आहे. भारतीय संघ त्यांपैकी २० तारखेला अफगाणिस्तानविरुद्ध ब्रिजटाऊन, २२ जूनला बांगलादेशविरुद्ध अँटिग्वा, तर २४ तारखेला ऑस्ट्रेलियाशी सेंट लुशिया येथे खेळणार आहे.

मुख्य म्हणजे साखळी फेरीतील सामने संपण्यापूर्वीच सुपर-८ फेरीचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड यांसारख्या बलाढ्य संघांना यंदा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. तर अमेरिकेने पदार्पणातच आगेकूच करण्याची किमया साधली. एकूणच आता सुपर-८ फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून येथेही चाहत्यांना थरारक लढतींची अपेक्षा आहे.

सुपर-८ फेरीचे वेळापत्रक

दिनांक वार सामना वेळ

१९ जून बुधवार अमेरिका वि. दक्षिण आफ्रिका रात्री ८ वा.

२० जून गुरुवार इंग्लंड वि. वेस्ट इंडिज सकाळी ६ वा.

२० जून गुरुवार भारत वि. अफगाणिस्तान रात्री ८ वा.

२१ जून शुक्रवार ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश सकाळी ६ वा.

२१ जून शुक्रवार इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका रात्री ८ वा.

२२ जून शनिवार वेस्ट इंडिज वि. अमेरिका सकाळी ६ वा.

२२ जून शनिवार भारत वि. बांगलादेश रात्री ८ वा.

२३ जून रविवार ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान सकाळी ६ वा.

२३ जून रविवार इंग्लंड वि. अमेरिका रात्री ८ वा.

२४ जून सोमवार वेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका सकाळी ६ वा.

२४ जून सोमवार भारत वि. ऑस्ट्रेलिया रात्री ८ वा.

२५ जून मंगळवार अफगाणिस्तान वि. बांगलादेश सकाळी ६ वा.

logo
marathi.freepressjournal.in