

मुंबई : पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी विविध ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे. अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला पुन्हा प्राधान्य देण्यात आले आहे. त्याशिवाय मुंबई, चेन्नई, दिल्ली व कोलकाता या शहरांतही विश्वचषकाचे सामने रंगतील.
पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. नुकतात महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाला होता. त्यामुळे पुरुषांच्या टी-२० विश्वचषकासाठी मुंबई किंवा नवी मुंबईला प्राधान्य देण्यात येईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणेच अंतिम सामना अहमदाबादला होणार आहे.
मुंबईतील वानखेडे, कोलकातामधील ईडन गार्डन्स, चेन्नईतील चेपॉक व नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर अन्य सामने होतील. त्याशिवाय भारत-पाकिस्तान सामना कराराप्रमाणे श्रीलंकेत होईल. २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून भारत-पाकिस्तान एकमेकांच्या देशांत खेळणार नाहीत, असा करार करण्यात आला. त्यामुळे भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने दुबईत झाले. तसेच महिलांच्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात न येता, श्रीलंकेत खेळला.
दरम्यान, भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी-२० मालिका खेळत आहे. त्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी, एकदिवसीय व टी-२० मालिका रंगणार आहे. बुधवारीच भारताचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला. डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे भारताच्या कसोटी संघात अपेक्षेप्रमाणे पुनरागमन झाले आहे. मात्र अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे.
२६ वर्षीय पंतला ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पायाला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे पंत आशिया चषकासह वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका व ऑस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकला. मात्र दक्षिण आफ्रिका-अ संघाविरुद्ध पंतने भारत-अ संघाचे नेतृत्व करताना तंदुरुस्ती सिद्ध केली. तसेच दुसऱ्या डावात ९० धावांची खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आता पंत संघात परतला आहे. परिणामी नारायण जगदीशनने संघातील स्थान गमावले आहे. विंडीजविरुद्ध ध्रुव जुरेलने यष्टिरक्षण केले होते, तर जगदीशन पर्यायी यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग होता. तसेच पंत हा कसोटी संघाचा उपकर्णधारही असेल. विंडीजविरुद्ध रवींद्र जडेजाकडे तात्पुरते उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते.
त्याशिवाय वेगवान गोलंदाज आकाश दीपही पाठदुखीतून सावरल्यामुळे त्याला प्रसिध कृष्णाच्या जागी कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. आकाशने रणजी स्पर्धेत बंगालकडून छाप पाडताना तंदुरुस्त असल्याचेही दाखवून दिले. आकाश व कुलदीप यादव भारत-अ संघाकडून दक्षिण आफ्रिका-अ विरुद्ध चार दिवसीय लढतही खेळणात आहेत. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड केली. विंडीजविरुद्धच्या मालिकेच्या तुलनेत हेच दोन बदल संघात करण्यात आले आहेत.
३५ वर्षीय शमीला गेले काही महिने संघाबाहेर ठेवल्यानंतर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान देण्यात येईल, असे वाटले होते. मात्र निवड समितीने पुन्हा डावलल्याने शमीला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, भारत-आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे, तर दुसरी कसोटी २२ तारखेपासून गुवाहाटी येथे रंगणार आहे. त्यानंतर उभय संघांत ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामन्यांची मालिकाही खेळवण्यात येणार आहे.