

मुंबई : टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार ७ फेब्रुवारी २०२६पासून भारत आणि श्रीलंकेत रंगणार असून भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील बहुचर्चित लढत १५ फेब्रुवारीला कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२६ चे वेळापत्रक मंगळवारी संध्याकाळी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.
भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात असून त्यांच्यासह अ गटात अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. गतविजेत्या भारताचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्लीत १२ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध खेळेल. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघ कोलंबोला रवाना होईल आणि गटातील शेवटचा साखळी सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. या स्पर्धेतील ५५ सामने भारत आणि श्रीलंकेतील आठ खेळपट्ट्यांवर खेळवले जाणार आहेत.
एमए चिदंबरम स्टेडियम (चेन्नई), अरुण जेटली स्टेडियम (नवी दिल्ली), वानखेडे स्टेडियम (मुंबई), ईडन गार्डन्स (कोलकाता), नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) तसेच आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो), सिन्हलसे स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड (कोलंबो) आणि पल्लिकल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (कँडी) येथे हे सामने होणार आहेत.
ब गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमान हे संघ असून क गटात इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटलीचा समावेश आहे. ड गटात न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि यूएई हे संघ असतील. या कार्यक्रमाला आयसीसीचे अध्यक्ष जय शहा, भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा, भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव तसेच महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हे उपस्थित होते. भारत आणि श्रीलंका हे दोन देश दुसऱ्यांदा (२०१२) या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करत आहेत.