

मुंबई : भारतात पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तिकीटविक्रीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. या स्पर्धेतील तिकीटे १०० रुपयांपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन आयसीसीने केले आहे.
७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतातील मुंबई, चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली आणि अहमदाबाद या पाच शहरात, तर श्रीलंकेतील कोलंबो व कँडी येथे विश्वचषकाचे सामने होतील. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी गुरुवारी मुंबई येथील पत्रकार परिषदेत याविषयी अधिकृत घोषणा केली. त्याच वेळी आयसीसीने बर्डवायझर या मद्य कंपनीशी भागीदारी केल्याचेही जाहीर केले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सहा साखळी फेरीचे, एक सुपर-आठ, तर एक उपांत्य असे एकूण ८ सामने रंगणार आहेत. त्यांपैकी भारत-अमेरिका यांच्यातील पहिला साखळी सामना वानखेडेवर होणार आहे. भारतीय संघाच्या सामन्यांसाठी तिकिटांचा दर ७५० रुपयांपासून सुरू होईल. तसेच ४ ते ५ हजारापर्यंत हा दर लांबेल. भारताव्यतिरिक्त, अन्य देशांच्या व आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व नसलेल्या देशांची तिकिटे १०० रुपयांना उपलब्ध असतील. जसे की नेपाळ, इटलीचे संघही वानखेडेवर खेळणार आहेत. त्यांच्या लढतीची तिकीटे १०० रुपयांना मिळू शकतील.
आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवरच तिकिटे ऑनलाइन खरेदी करता येईल. अन्य कोणताही वेबसाईटवर चाहत्यांनी तिकिटे घेऊ नयेत. कारण यामुळे फसवणूक होऊ शकते, असेही आयसीसीने स्पष्ट केले. २०२६मध्ये पुरुषांचा हा १०वा टी-२० विश्वचषक होत आहे. तसेच २०१६ नंतर म्हणजेच १० वर्षांनी भारताला पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. प्रथमच विश्वचषकात २० संघ देखील सहभागी होणार आहेत. काही दिवशी तीन-तीन सामने ठेवण्यात आले असून भारतीय वेळेनुसार सकाळी ११, दुपारी ३ आणि सायंकाळी ७ वाजता लढती सुरू होतील.
दरम्यान, टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले. यावेळी भारताच्या २०२४च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्माला स्पर्धेचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून जाहीर करण्यात आले. रोहित टी-२०तून निवृत्त झालेला आहे. भारताला साखळी फेरीत अमेरिका, पाकिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स या संघांशी दोन हात करायचे आहेत. १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत श्रीलंकेत होईल. सूर्यकुमार यादव टी-२० विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. मात्र भारताचे १५ खेळाडू कोण असतील, याविषयी सध्या चर्चाविनिमय सुरू आहे.
सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांनाही टी-२० मालिकेमध्ये नमवले. भारताने २०२४च्या विश्वचषकानंतर अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. गेल्या २७ टी-२० सामन्यांपैकी फक्त ४ लढतींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ उत्तमरित्या मार्गक्रमण करत आहे. मात्र विश्वचषकासाठी अद्याप दीड महिन्याचा कालावधी असल्याने खेळाडूंना तंदुरुस्तीवरही लक्ष द्यावे लागेल. प्रशिक्षक गौतम गंभीरचे मार्गदर्शनही या वाटचालीत मोलाचे ठरणार आहे.
वानखेडे स्टेडियमवरील सामने
७ फेब्रुवारी : भारत वि. अमेरिका
८ फेब्रुवारी : इंग्लंड वि. नेपाळ
११ फेब्रुवारी : इंग्लंड वि. वेस्ट इंडिज
१२ फेब्रुवारी : नेपाळ वि. इटली
१५ फेब्रुवारी : नेपाळ वि. वेस्ट इंडिज
१७ फेब्रुवारी : नेपाळ वि. बांगलादेश
२३ फेब्रुवारी : सुपर-आठ फेरीची लढत
५ मार्च : उपांत्य सामना
हरमनप्रीत, युवराज यांच्या नावे स्टँड
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नावाच्या स्टँडचे गुरुवारी मुल्लानपूर येथील स्टेडियममध्ये अनावरण करण्यात आले. मुल्लानपूरच्या महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना झाला. यावेळी दोन्ही क्रिकेटपटू उपस्थित होते. तसेच रवी शास्त्री यांनी भारताचा कर्णधार सूर्यकुमारच्या हस्ते विश्वचषकाच्या तिकीट विक्रीचाही अधिकृत प्रारंभ केला.