T-20 WC: जगतजेत्ता भारत, विश्वविजयाचा आनंदोत्सव

भारताने आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपुष्टात आणला. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या थरारक अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर अवघ्या ७ धावांनी विजय मिळवला.
T-20 WC: जगतजेत्ता भारत, विश्वविजयाचा आनंदोत्सव
Screengrab: StarSports
Published on

मुंबई : १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी रात्री भारतीय संघाने त्या झळाळत्या विश्वचषकाला पुन्हा गवसणी घातली. रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व, विराट कोहलीची निर्णायक वेळी झुंजार खेळी, जसप्रीत बुमराची अविश्वसनीय गोलंदाजी आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोलाचे मार्गदर्शन यांसारख्या असंख्य महत्त्वपूर्ण बाबींच्या बळावर भारताने आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपुष्टात आणला. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या थरारक अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर अवघ्या ७ धावांनी विजय मिळवला.

विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही भारताने साध्य केलेले हे यश अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील. आफ्रिकेला ३० चेंडूंत ३० धावांची आवश्यकता असताना भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी तसेच रोहितचे नेतृत्व वाखाणण्याजोगे होते. सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात टिपलेला झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला. राहुल द्रविड यांचा भारतीय प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा सामना होता. त्यामुळे त्यांनाही ड्रेसिंग रूममध्ये स्वत:च्या भावनांवर नियंत्रण राखणे कठीण गेले.

या विजयानंतर संपूर्ण भारतात विश्वविजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात तमाम चाहते मग्न झाले. असंख्य ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच विश्वचषकाची प्रतिकृती, भारताचे तिरंगे व खेळाडूंच्या प्रतिमेसह मिरवणुकाही काढण्यात आल्या. खेळाडूंनाही स्वत:च्या भावनांवर नियंत्रण राखणे कठीण गेले. भारताने विजय मिळवताच रोहित मैदानावर खाली कोसळला. तसेच त्याने हार्दिक पंड्याला आलिंगन दिले. रोहित व विराट यांना एकत्रित चषकासह छायाचित्र काढताना पाहून चाहत्यांचेही भान हरपले. तसेच द्रविड यांना खांद्यावर घेत भारतीय खेळाडूंनी त्यांचेही आभार मानले.

इतकेच नव्हे तर, हार्दिक, विराट कोहली यांना अश्रूंना आवर घालता आला नाही. भारतीय क्रिकेटसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या रोहित व विराट यांनी या जेतेपदानंतर टी-२० कारकीर्दीला अलविदा केला. त्याशिवाय रवींद्र जडेजानेही निवृत्तीचा निर्णय घेतला. रोहितने बार्बाडोसमध्ये भारताचा तिरंगा फडकावतानाच तेथील गवताची चवही घेतली. प्रतिभावान आणि विश्वातील सर्वोत्तम जसप्रीत बुमरा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. विराट सामनावीर झाला. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम फेरीत मायदेशातच ऑस्ट्रेलियाकडून पत्करलेला पराभव खेळाडूंसह अनेकांच्या जिव्हारी लागणारा होता. मात्र या विजयामुळे त्या पराभवाच्या जखमा काहीशा भरून निघाल्या आहेत, हे नक्की. आता रोहित व विराट नव्या पिढीकडे सूत्रे सोपवून पुढील आव्हानासाठी सज्ज होणार आहेत. मात्र त्यांच्यासह सर्व खेळाडूंनी देशासाठी या स्पर्धेत दिलेल्या योगदानाचा आढावा घेणे तितकेच महत्त्वाचे. त्याच निमित्ताने नवशक्तिच्या वाचकांसाठी भारताच्या विश्वविजयाची ही खास क्षणचित्रे.

पंतप्रधानांशी संवाद

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. तसेच मोदी यांनी ट्विटरवर यासंबंधी खास संदेश पोस्ट केला. भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशी मोदी यांनी संवाद साधला. तसेच रोहित व विराट यांना निवृत्तीविषयी शुभेच्छा दिल्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही अभिनंदन केले.

रोहित-हार्दिकचे आलिंगन

गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रोहित व हार्दिक पंड्या यांच्यात आयपीएलमध्ये खेळताना सारे काही आलबेल नसल्याची चर्चा होती. रोहितकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नेमल्याने तो अनेकांच्या नापसंतीस उतरला. तसेच अनेकांनी हार्दिकवर टीका केली. यामुळे त्याची कामगिरीही ढासळली. मात्र या दोन्ही खेळाडूंनी विश्वचषकात असे काही जाणवू न देता संघासाठी सर्वोत्तम योगदान दिले. तसेच सर्व अफवांना धुडकावून लावले. त्यामुळेच रोहितने विजयानंतर हार्दिकला आलिंगन दिलेले पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

logo
marathi.freepressjournal.in