अतिआत्मविश्वासाचा फटका! मानहानीकारक पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर दिग्गजांकडून टीका

भारतीय संघातील फलंदाजांना अतिआत्मविश्वासाचा फटका बसला असून उर्वरित स्पर्धेत त्यांनी परिस्थितीनुसार खेळ केला नाही, तर भारताला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणे कठीण होईल, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
अतिआत्मविश्वासाचा फटका! मानहानीकारक पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर दिग्गजांकडून टीका
अतिआत्मविश्वासाचा फटका! मानहानीकारक पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर दिग्गजांकडून टीकाPhoto : X (BCCI)
Published on

अहमदाबाद : भारतीय संघातील फलंदाजांना अतिआत्मविश्वासाचा फटका बसला असून उर्वरित स्पर्धेत त्यांनी परिस्थितीनुसार खेळ केला नाही, तर भारताला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणे कठीण होईल, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सुपर-आठ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. १८८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ १८.५ षटकांत १११ धावांतच गारद झाला. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक साकारता आले नाही. तसेच भारताची धावगती (नेट रनरेट) फारच खालावल्याने उर्वरित दोन लढती मोठ्या फरकाने जिंकणे त्यांच्यासाठी अनिवार्य असेल. भारताची आता २६ तारखेला झिम्बाब्वेशी गाठ पडेल, तर १ मार्च रोजी त्यांच्यासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान असेल.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान आहे. भारताने अ-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सलग चार विजय नोंदवले. भारताने सर्वप्रथम वानखेडेवर अमेरिकेला पराभूत केले. मग नवी दिल्ली येथे नामिबियाला धूळ चारली. कोलंबो येथे पाकिस्तानला चीतपट करून भारताने सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील स्थान पक्के केले. मग चौथ्या साखळी लढतीत नेदरलँड्सवर मात करून भारताने विजयी चौकार लगावला.

सुपर-आठ फेरीसाठी भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे हे चारही संघ साखळी फेरीत आपापल्या गटात अग्रस्थानी राहिले होते. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळताना भारताचा कस लागेल, हे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आफ्रिकेने सहज वर्चस्व गाजवले. इशान किशन (०), तिलक वर्मा (१), अभिषेक शर्मा (१५), सूर्यकुमार (१८), वॉशिंग्टन सुंदर (११), हार्दक पंड्या (१८), रिंकू सिंग (०) अशी निराशाजनक कामगिरी भारतीय फलंदाजांनी केली. शिवम दुबेने ४२ धावांची एकाकी झुंज दिली. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती बऱ्याच कालावधीनंतर महागडा ठरला. जसप्रीत बुमरा (१५ धावांत ३ बळी) व अर्शदीप सिंग (२ बळी) यांनी मात्र कामगिरी चोखपणे बजावली. त्यामुळेच गावस्करांसह अनेक माजी क्रिकेपटूंनी फलंदाजांवर प्रामुख्याने निशाणा साधला आहे.

“भारतीय फलंदाज सध्या अतिआत्मविश्वासू आहेत, असे मला वाटते. कारण त्यांनी खेळपट्टी व समोरील गोलंदाजाचा आदर न राखता चुकीचे फटके खेळले. आपण विश्वचषकापूर्वी झालेल्या मालिकांमध्ये जवळपास प्रत्येक लढतीत २०० धावा सहज करत होतो. तसेच धावांचा पाठलागही उत्तम करत होतो. मात्र विश्वचषकाचे दडपण वेगळे असते. येथील खेळपट्ट्या वेगळ्या असतात,” असे गावस्कर म्हणाले.

“भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांकडून शिकायला हवे होते. २० ते २५ धावांत ३ बळी गेल्यानंतर ब्रेविस व मिलर यांनी अप्रतिम फलंदाजी करून संघाला १८० धावांपुढे मजल मारून दिली. ज्या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळते, तसेच फिरकीपटूंनाही सहाय्य लाभते. जेथे दव फारसे येत नाही, तेथे भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. यावर लवकरच तोडगा काढला नाही, तर भारताला विश्वचषक जिंकणे कठीण जाईल,” असेही गावस्कर यांनी सांगितले.

आता एकूणच भारतीय संघ झिम्बाब्वे व वेस्ट इंडिजविरुद्ध कसा खेळ करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून असेल.

तिलककडून पूर्णपणे निराशा !

तिलक हा एक हुशार आणि जबाबदारीने खेळणारा फलंदाज आहे. मात्र या स्पर्धेत किंबहुना आफ्रिकेविरुद्ध त्याने जसा खेळ केला, ते निराशाजनक होते. किशन पहिल्याच षटकात बाद झालेला असताना तिलकने खेळपट्टीवर उभे राहणे गरजेचे होते. तसेच अभिषेकही सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे तो दडपणाखाली होता. अशा वेळी तिलकने अतिआक्रमकपणा दाखवला व तो माघारी परतला, अशा शब्दांत गावस्कर यांनी तिलकवरही निशाणा साधला.

भारताची संघनिवड चुकीची !

भारतीय संघाची ११ खेळाडूंची निवड चुकीची ठरत आहे, असे मत काही माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी व्यक्त केले. अक्षर पटेल संघात गरजेचा असून सुंदरला का संधी देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच अभिषेक सलग चार सामन्यांत अपयशी ठरलेला असताना आता तरी संजू सॅमसनला सलामीला संधी द्यावी किंवा किमान पहिल्या तीन फलंदाजांमध्ये तिघेही डावखुरे न ठेवता, एका उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यास स्थान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in