

लखनाै : जागतिक कनिष्ठ गटातील रौप्यपदक विजेत्या तन्वी शर्माने गुरुवारी वरिष्ठ गटात धक्कादायक विजयाची नोंद केली. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत १६ वर्षीय तन्वीने जपानच्या माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
लखनऊ येथे ३०० सुपर गुणांचा दर्जा असलेली सय्यद मोदी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत तन्वीने ३० वर्षीय ओकुहारावर १३-२१, २१-१६, २१-१९ अशी तीन गेममध्ये मात केली. ५९ मिनिटांमध्ये तिने सामना आपल्या नावे केला. ओकुहारा ही २०१६च्या ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती खेळाडू असून तिने अनेकदा भारताच्या पी. व्ही. सिंधूसह अन्य महिलांना नमवलेले आहे. रिओ ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यासोबतच, नोझोमी ओकुहारा ही महिला एकेरीत (वरिष्ठ) माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरही राहिली आहे.
मात्र तन्वीने कारकीर्दीत प्रथमच ओकुहाराविरुद्ध खेळताना तिला पिछाडीवरून पराभूत केले. तन्वीसमोर आता एस. एच. लोचे आव्हान असेल. तन्वीने २०२४मध्ये ओदिशा मास्टर्स, तर २०२५मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मग कनिष्ठ जागतिक स्पर्धेत तिने ऐतिहासिक रौप्यपदक प्राप्त केले. त्यामुळे तिच्याकडे भविष्यातील तारका म्हणून पाहिले जात आहे. अग्रमानांकित उन्नती हूडाने भारताच्याच तस्निम मीरला २१-१५, २१-१० असे नेस्तनाबूत केले. उन्नतीसमोर रक्षिता रामराजचे आव्हान असेल. रक्षिताने देविका सिहागवर २१-१६, २१-१७ अशी मात केली.
दरम्यान, पुरुष एकेरीत भारताच्या मनराज सिंगने भारताच्याच एच. एस. प्रणॉयला २१-१५, २१-१८ अशी धूळ चारली. त्याशिवाय किदाम्बी श्रीकांतने सनीत ध्यानचंदवर २१-६, २१-१६ असे वर्चस्व गाजवले. किरण जॉर्ज, अलाप मिश्रा, सिद्धार्थ गुप्ता यांना मात्र दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
महिला दुहेरीत त्रिशा जॉली व गायत्री गोपिचंद या गतविजेत्या जोडीने झेनित एबिगल व लिखिता श्रीवास्तव यांच्यावर २१-१७, २१-१२ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. त्रिशाने मिश्र दुहेरीत हरिहरनच्या साथीने आगेकूच केली.
दरम्यान, २०२५ या वर्षात आतापर्यंत फक्त आयुष शेट्टी (यूएस ओपन) आणि लक्ष्य सेन (ऑस्ट्रेलियन ओपन) या दोन भारतीयांनीच वरिष्ठ पातळीवरील एखादी स्पर्धा जिंकलेली आहे.