
नवी दिल्ली : भारताच्या १९ वर्षीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सोमवारी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावताना जगज्जेत्या डी. गुकेशवर सरशी साधली. सोमवारी १३व्या फेरीत टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदने गुकेशवर मात केली.
बुद्धिबळ विश्वात प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या या स्पर्धेत चेन्नईच्या प्रज्ञानंदने टायब्रेकरमध्ये १८ वर्षीय गुकेशवर २-१ अशी मात केली. १३व्या फेरीनंतर दोन्ही खेळाडूंच्या खात्यात ८.५ असे समान गुण होते. मात्र टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदने बाजी मारली. त्यामुळे गुकेशला पराभव पत्करावा लागला.
“आजचा दिवस संस्मरणीय होता. गुकेशला नमवणे आव्हानात्मक होते. विशेषत: १३व्या फेरीतील बरोबरीनंतर टायब्रेकरपूर्वी माझ्यावर काहीसे दडपण होते. मात्र मी सर्वोत्तम खेळ करत विजय मिळवला,” असे प्रज्ञानंद म्हणाला. विश्वनाथन आनंदनंतर टाटा स्टील स्पर्धा जिंकणारा प्रज्ञानंद दुसराच भारतीय बुद्धिबळपटू ठरला. आनंदने २००३, २००४ व २००६मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
दुसरीकडे गुकेशचा विचार करता त्याने डिसेंबरमध्ये जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत जिंकून सर्वात युवा जगज्जेता ठरण्याचा मान मिळवला होता. गुकेशने त्यावेळी चीनच्या डिंग लिरेनला पराभूत केले होते. त्यानंतर प्रथमच गुकेश एखाद्या स्पर्धेत सहभागी झाला. मात्र उपविजेतेपदानंतरही त्याने प्रज्ञानंदचे कौतुक केले. गतवर्षीसुद्धा गुकेशला टाटा स्टील स्पर्धेत उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते.
“प्रज्ञानंदचे विजेतेपदासाठी कौतुक होणे गरजेचे आहे. त्याने माझ्यापेक्षा सर्वोत्तम खेळ केला. टायब्रेकरमध्ये मी निर्णायक क्षणी चूक केली,” असे गुकेश म्हणाला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश, प्रज्ञानंद आणि विदीत गुजराथी असे भारताचे तीन खेळाडू सहभागी झाले होते.