
भारतीय क्रिकेट संघाने (Team India) आता आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये (ICC Ranking) अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीने जारी केलेल्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ एकदिवसीय, टी-२० तसेच कसोटीमध्येही पहिल्या स्थानी विराजमान आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये पहिल्याच कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. भारतीय संघाला याचा मोठा फायदा आयसीसी क्रमवारीत झाला आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल स्थानी विराजमान आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ १११ गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला. इंग्लंडचा संघ १०६ गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंडचा संघ १०० गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ८५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. २०२३ या वर्षात आत्तापर्यंत भारतीय संघाने एकही मालिका गमावलेली नाही. पहिले श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकली. त्यानंतर न्यूझीलंडसोबतही मालिका विजय प्राप्त केला.
अश्विनने कसोटी गोलंदाजी गाठले दुसरे स्थान
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या नागपूर कसोटीत भारताच्या आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीची कमाल दाखवला. यावेळी दोघांच्या खात्यात एकूण १५ विकेट आहेत. या कसोटीमध्ये अश्विनने चांगली कामगिरी करत ८ विकेट्स घेतल्या. त्यानंतर आता अश्विनने ८४६ रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरून दुसरे स्थान पटकावले आहे.